मेरे प्रिय बिहारवासीयों...! 

मेरे प्रिय बिहारवासीयों...! 

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षांतर्गत एकीचे आवाहन करत केंद्र आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका केली. लालू तुरुंगात गेल्याने पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी तेजस्वी यांनी वेगाने पावले उचलत लालूंनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्राचे पक्षाच्या नेत्यांसमोर वाचन केले. 

ते म्हणाले, ''लालूंनी तुरुंगातच हे पत्र लिहिले होते. लालूंचा हा संदेश राज्यभर पोचविण्यात येईल. आजच्या बैठकीस 'राजद'चे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि जिल्हा पातळीवरील महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.'' भविष्यातील पक्षाची वाटचाल हा एकमेव मुद्दा या चर्चेच्या केंद्रस्थानी होता, असेही त्यांनी नमूद केले. लालूप्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांना संघर्षाचे आवाहन केले होते, त्याला पुढे नेण्यात येईल. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी यासाठी रणनीती आखली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

आधीच ठरले नियोजन 
नितीशकुमार आणि भाजपवर टीका करताना तेजस्वी म्हणाले, की ''ज्यांना लोकांनी निवडले ते आज तुरुंगात आहेत. ज्यांना निवडले नव्हते ते चोर दरवाज्यातून प्रवेश करत सत्ताधीश झाले आहेत. भाजपपेक्षा नितीशकुमारच आम्हाला अधिक घाबरले होते.'' लालूंना तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होताच पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणार याचे नियोजन आधीच आखण्यात आले होते. आता 2020 पर्यंत आमचा पक्ष तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालीच काम करेल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते जगदानंदसिंह यांनी नमूद केले. 

लालूंनी भाजपसोबत हातमिळवणी केली असती, तर ते आज हिंदुस्थानचे राजा हरिश्‍चंद्र बनले असते. लालूंचा 'डीएनए' बदलला असता तर तथाकथित चारा घोटाळा हा भाईचारा घोटाळा झाला असता. 
- तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते. 

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत आमची आघाडी असून, यावर या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही. 
आर. पी. एन. सिंह, काँग्रेसचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com