महाराष्ट्र व कर्नाटकात जलसाठा स्थिती चांगली 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

जल आयोगातर्फे आज जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पश्‍चिम विभागात समाविष्ट होणाऱ्या महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत मिळून असलेल्या 27 जलाशयांतील जलसाठ्याची 28 सप्टेंबरअखेरीची उपलब्धता 20.79 अब्ज क्‍युसेक मीटर (बीसीएम) इतकी आहे. या जलाशयांच्या एकंदर क्षमतेच्या 77 टक्के इतका हा जलसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण 82 टक्के होते.

नवी दिल्ली : मॉन्सूनच्या माघारीला सुरवात होत असताना 28 सप्टेंबरअखेर महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये जलसाठ्याची उपलब्धता व स्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली असल्याचे केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे.

राजस्थान, झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व तेलंगण या राज्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जलसाठ्याची उपलब्धता आहे. ही प्रमुख शेतीमाल उत्पादक राज्ये असल्याने या कमी जलसाठ्याचा परिणाम शेती उत्पादनावर होऊ शकतो. 

जल आयोगातर्फे आज जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पश्‍चिम विभागात समाविष्ट होणाऱ्या महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत मिळून असलेल्या 27 जलाशयांतील जलसाठ्याची 28 सप्टेंबरअखेरीची उपलब्धता 20.79 अब्ज क्‍युसेक मीटर (बीसीएम) इतकी आहे. या जलाशयांच्या एकंदर क्षमतेच्या 77 टक्के इतका हा जलसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण 82 टक्के होते त्यामुळे त्या तुलनेत ही टक्केवारी व जलसाठा कमी असल्याचे निदर्शनास येते. महाराष्ट्राची आकडेवारी स्वतंत्रपणे विचारात घेतल्यास ती गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याने महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता अधिक असल्याचे आढळून येते, असेही आयोगाने म्हटले आहे. 

केंद्रीय जल आयोगाच्या देखरेखीखाली देशातील 91 प्रमुख जलाशयांचा समावेश होतो. उत्तर, पूर्व, पश्‍चिम, मध्य आणि दक्षिण अशा पाच विभागांत त्यांची विभागणी आहे. आज जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केवळ उत्तर विभागातच जलसाठ्याची उपलब्धता गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली आहे. परंतु उर्वरित विभागांतील जलसाठ्याची उपलब्धता मात्र कमी आढळून आलेली आहे. विभागवार हे चित्र असले, तरी राज्यवार स्थिती ही वेगवेगळी आढळून येते व त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचा स्वतंत्र विचार केल्यास पाण्याची उपलब्धता गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे.

Web Title: marathi news marathi websites Monsoon Maharashtra Pune news