गुवाहाटीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर दगडफेक 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

गुवाहाटी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर पदार्पण केलेल्या गुवाहाटीमध्ये पहिल्याच सामन्यानंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे कलंक लागला. भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने काल (मंगळवार) विजय मिळविला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक झाली. सुदैवाने, यात कुणीही जखमी झालेले नाही. 

गुवाहाटी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर पदार्पण केलेल्या गुवाहाटीमध्ये पहिल्याच सामन्यानंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे कलंक लागला. भारताविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने काल (मंगळवार) विजय मिळविला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक झाली. सुदैवाने, यात कुणीही जखमी झालेले नाही. 

विशेष म्हणजे, क्रिकेटशिवाय सध्या येथे 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे सामनेही होत आहेत. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. 'या प्रकरणी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे' अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्‌विटरवरून दिली. 

गुवाहाटीमध्ये काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पदार्पण झाले. या सामन्यात भारताचा पराभव झाला. सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बसमधून हॉटेलवर परतत असताना ही दगडफेक झाली.

ऑस्ट्रेलियाची बस स्टेडियममधून बाहेर पडत असताना काही क्रिकेटप्रेमींनी त्या बसचा काही वेळ पाठलाग केला होता. पण स्टेडियमच्या आवारात असेपर्यंत त्या बसवर दगडफेक झाली नव्हती. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचने या संदर्भात ट्‌विट केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'नेही या घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, दगडफेक झाली तेव्हा त्या खिडकीजवळ कुणीही बसले नव्हते. या घटनेत ऑस्ट्रेलियाचा कोणताही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफपैकी कुणीही जखमी झालेले नाही. 

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. 'गुवाहाटीमध्ये झालेली दगडफेकीची घटना म्हणजे संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रातिनिधित चित्र नाही. ऑस्ट्रेलिया आणि 'फिफा'ला सुरक्षा व्यवस्थेविषयी शंका नाही' असे राठोड यांनी सांगितले. 

'आयपीएल'चं काय होणार? 
गुवाहाटीच्या या मैदानावर पुढील वर्षी 'आयपीएल'मधील काही सामन्यांचे आयोजन करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात होते. तसेच, 'आयपीएल'मध्ये पुनरागमन करणाऱ्या 'राजस्थान रॉयल्स' संघाचे 'होम ग्राऊंड' म्हणूनही या मैदानाला पसंती देण्यात आल्याचे वृत्त होते. या दगडफेकीच्या घटनेमुळे आता 'आयपीएल' सामन्यांच्या आयोजनावर पुनर्विचार केला जाण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news marathi websites Sports News Cricket news India versus Australia Guwahati