दिग्गजांच्या साक्षीने रूपानींचा 'विजय'तिलक 

Vijay Rupani and Narendra Modi
Vijay Rupani and Narendra Modi

गांधीनगर : संघ परिवाराचे लाडके आणि अमित शहा यांच्या खास 'विश्‍वासातील माणूस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय रूपानी यांनी आज सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रूपानी यांच्यासमवेतच उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि अन्य 18 मंत्र्यांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य शपथविधी समारंभ पार पडला. 

या समारंभाला जाण्यापूर्वी पटेल यांनी सपत्नीक पंच महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. रूपानी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये नऊ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. नितीन पटेल, भूपिंदरसिंह चुडास्मा, आर. सी. फाल्दू, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गणपतसिंह वसावा, जयेश रदादिया, दिलीप ठाकोर आणि ईश्‍वर परमार यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यमंत्र्यांमध्ये प्रदीपसिंह जडेजा, परबत पटेल, पुरुषोत्तम सोलंकी, बचूभाई खाबड, जयद्रथ परमार, ईश्‍वरसिंह पटेल, वसन अहीर, किशोर कानानी, रमणलाल पाटकर आणि विभावरीबेन दवे यांचा समावेश आहे.

नव्या नऊ मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये मागील मंत्रिमंडळातील पाच जणांना स्थान मिळाले असून, राज्यमंत्र्यांमध्येही मागील पाच मंत्र्यांचा समावेश आहे. या शपथविधी समारंभाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. 

जातीय समीकरणांचे प्रतिबिंब 
रूपानी यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्री हे पटेल समुदायातील असून, भावनगर पूर्व मतदारसंघातून निवडून आलेल्या विभावरीबेन दवे या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री ठरल्या आहेत. नव्या मंत्रिमंडळामध्येही भाजपने जातीय समीकरणे आणि प्रादेशिक समतोल सांभाळण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या मंत्रिमंडळात सहा ओबीसी, तीन अनुसूचित जमाती, एक अनुसूचित जाती, दोन क्षत्रिय आणि अन्य दोन सवर्ण नेत्यांचा समावेश आहे. 

भाजपचे 'सर्वमित्र' नेते 
दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले विजय रूपानी हे पक्षामध्ये सर्वमित्र म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा साधा स्वयंसेवक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. राज्यामध्ये पटेल आरक्षण आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर त्यांनी मोठ्या संयमाने परिस्थिती हाताळली होती. दुसऱ्यांदा मिळालेले मुख्यमंत्रिपद हे त्याचीच बक्षिसी असल्याची चर्चा आहे.

रूपानी यांचा जन्म तसा रंगूनमधील (आताचे म्यानमारमधील यंगून). विद्यार्थीदशेतच त्यांचा संघप्रवेश झाला होता. भाजपमध्ये सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले होते. या निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती केंद्रित राहिला असला तरीसुद्धा रूपानी यांनीही महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

जैन समुदायातील नेते असणाऱ्या रूपानी यांनी पक्षाविरोधातील असंतोष कमी करण्यात मोठी भूमिका पार पाडली. पटेल, शेतकरी आणि शहरी मतदार अशा तिन्ही घटकांशी त्यांनी अनुकूल संवाद साधला होता. या वेळेस भाजप आमदारांची संख्या घटली असलीतरीसुद्धा पक्ष नेतृत्वाचा रूपानी यांच्यावरील विश्‍वास कायम आहे. कुशल प्रशासक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. राजकोट पश्‍चिम मतदारसंघातून सलग दोनदा निवडून आलेले रूपानी 2006 ते 2012 या काळात राज्यसभेवरील भाजपचे सदस्यही होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com