काँग्रेसने देशाचे तुकडे केले : मोदी 

Narendra Modi in Lok Sabha
Narendra Modi in Lok Sabha

नवी दिल्ली : 'काँग्रेसने देशाचे तुकडे केले. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते, तर काश्‍मीरप्रश्‍न निर्माण झाला नसता,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा नव्हे, तर म. गांधीजींचा विचार असल्याचेही ते म्हणाले. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला मोदींनी लोकसभा व राज्यसभेत आज उत्तर दिले. त्यांच्या भाषणाचा भर सरकारच्या विकास योजनांपेक्षा काँग्रेसला लक्ष्य करण्यावर जास्त राहिला. पंतप्रधानांच्या उत्तराला काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी घातलेल्या गोंधळाचे गालबोट लागले. इतिहासातील घटनांची उदाहरणे देत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. सोनिया गांधी व राहुल गांधी या वेळी सभागृहात उपस्थित होते. 
मोदी म्हणाले, ''काँग्रेसने देशाचे तुकडे केले आणि संपूर्ण सत्ताकाळ एका कुटुंबाची आरती ओवाळण्यात घालविला. देशाला लोकशाही पंडित नेहरूंनी दिलेली नाही. काँग्रेसने सरदार पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केले. पटेल पंतप्रधान असते तर काश्‍मीर प्रश्‍न निर्माण झाला नसता.'' या उत्तराने समाधान न झाल्यामुळे काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेसने सभात्याग करून आपली नाराजी व्यक्त केली. 

पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांना आडवळणाने लक्ष्य करताना 'यूपीए' सरकारचा अध्यादेश फाडणे, डोकलाम प्रकरणी चिनी राजदूताची भेट या घटनांच्या उल्लेखातून मोदींनी राहुल गांधींवर थेट प्रहार केला. परंतु बोलण्याच्या ओघात त्यांनी संसद सदस्यांना 'भाईयों बहनो' असेही संबोधित केले. एवढेच नव्हे तर भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या सिमला कराराचा उल्लेख करताना हा करार इंदिरा गांधी आणि बेनझीर भुट्टो यांच्यात झाल्याचेही सांगितले. प्रत्यक्षात हा करार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्यात झाला होता. पंतप्रधानांच्या या विधानामुळे बरेच खासदार आश्‍चर्यचकित झाल्याचे दिसून आले. 

आंध्र प्रदेशसाठी आर्थिक मदत मागणीवरून तेलुगू देसम पक्षाच्या खासदारांनी आजही गोंधळ घातला. मात्र मोदींच्या उत्तराच्या वेळी हे खासदार शांत झाले असताना काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत उतरून आक्रमक घोषणाबाजी सुरू केली. वारंवार आवाहन करूनही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने मोदींनी गोंधळातच उत्तराला प्रारंभ केला. 

सर्व विकास योजनांची सुरवात काँग्रेसच्या सत्ताकाळात झाल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा दावा खोडून काढताना मोदींनी या काळात झालेल्या प्रगतीच्या गतीवर प्रश्‍न उपस्थित केला. एवढेच नव्हे तर कर्नाटक निवडणुकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पद कायम राहण्याची शक्‍यता कमी असल्यामुळे त्यांनी निरोपाचे भाषण केले, असाही टोला मोदींनी लगावला. 

लोकशाहीवरूनही मोदींनी काँग्रेसला धारेवर धरले. काँग्रेसला वाटते की देशाला पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसने लोकशाही दिली. परंतु प्राचीन काळापासून देशात लोकशाही अस्तित्वात असल्याचा दावा करताना मोदींनी लिच्छवी साम्राज्याचे, बौद्ध संघाचे तसेच बसवेश्‍वरांच्या 'अनुभव मंडपम'चे उदहरण देऊन लोकशाही भारताच्या रक्तात असल्याचे सांगितले. सोबतच, घराणेशाहीवरून सूचक शब्दांत फटकारताना मोदींनी, 'काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही,' असा टोला लगावला. 

मोदी उवाच... 

  • पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, ओडिशा, केरळ सरकारने गेल्या चार वर्षांत रोजगार वाढल्याचे म्हटले आहे. हे काँग्रेस कसे नाकारणार? 
  • 80 च्या दशकात 21व्या शतकाची स्वप्ने दाखवली, पण 2022 मध्ये योजनापूर्तीबद्दल बोललो तर त्याचा त्रास होतो. 
  • गॅस पुरवठ्यावरून कतार आणि ऑस्ट्रेलियाशी काँग्रेस सरकारने केलेल्या करारावरून पुन्हा वाटाघाटी करताना आपण देशाचे अनुक्रमे आठ हजार कोटी आणि चार हजार कोटी रुपये वाचवले. या करारामध्ये कोणाचा फायदा झाला हे जनता काँग्रेसला विचारेल. 

बुडीत कर्ज हे काँग्रेसचे पाप 
बॅंकांच्या थकीत कर्जावरून (एनपीए) काँग्रेसकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. त्याचा समाचार घेताना मोदींनी बॅंकांचा 'एनपीए' हे खरे काँग्रेसचे पाप आहे, असा पलटवार केला. ते म्हणाले, की 'एनपीए'साठी पूर्णपणे 'यूपीए' सरकार जबाबदार आहे. 'यूपीए'च्या काळात अनिर्बंध कर्जवाटप झाले होते. बॅंकांचे थकीत कर्ज 36 टक्के (18 लाख कोटी रुपये) असल्याचे सांगण्यात आले. परंतु माझ्या सरकारने कागदपत्रांचा ढीग उपसल्यानंतर प्रत्यक्षात थकीत कर्ज तब्बल 82 टक्के म्हणजे 52 लाख कोटी रुपये असल्याचे आढळून आले. काँग्रेसच्या या पापाबद्दल मी बोललो असतो, तर संपूर्ण बॅंकिंग व्यवस्था कोलमडून पडली असती. तसे होऊ नये म्हणून देशाच्या भल्यासाठी हे आरोप सहन केले. माझ्या सरकारने 'एनपीए' वाढेल, असे एकही कर्ज दिले नाही. आता जो 'एनपीए'चा आकडा वाढताना दिसतो आहे ते 52 लाख कोटी रुपयांवरील व्याज आहे. परंतु माझ्या सरकारचे स्वच्छता अभियान केवळ रस्त्यांवरच नाही, तर या प्रकाराविरुद्धही आहे, असा इशारा मोदींनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com