लग्नानंतरही मुलीची जात बदलत नाही : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

''जन्मत: जी जात मिळाली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. त्यामुळे जरी लग्न केले तरीदेखील लग्नानंतर जात बदलत नाही''

नवी दिल्ली : महिलेने आंतरजातीय विवाह केला तरी लग्नानंतर तिची जात बदलत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. त्यामुळे लग्नानंतर मुलीची जात बदलत असल्याचा समज आता चुकीचा ठरणार आहे. मुलगी ज्या घरात जन्माला येते अखेरपर्यंत ती त्याच जातीची राहते, असेही न्यायालयाने सांगितले.

बुलंदशहरमधील एक महिलेने याबाबत याचिका दाखल केली होती. संबंधित महिला 21 वर्षांपूर्वी एका केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून रूजू झाली होती. मात्र, हे पद तिने मागासवर्गीय कोट्यातून मिळवले होते. मात्र, तिचा जन्म सर्वसाधारण प्रवर्गात झाल्याचे समोर आल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची नियुक्ती रद्द केली होती. या शिक्षिकेने न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच ठरवले. पती मागासवर्गीय समाजातील असल्याने लग्नानंतर आपणही त्याच जातीचे झाल्याचे तिने सांगितले. मात्र, न्यायमूर्ती एम. एम. शंतनागौदर आणि अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने तिचा दावा खोडून काढत हा निर्णय दिला. 

याबाबत न्यायालयाने सांगितले, की ''जन्मत: जी जात मिळाली आहे, त्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. त्यामुळे जरी लग्न केले तरीदेखील लग्नानंतर जात बदलत नाही'', असे या खंडपीठाने स्पष्ट केले.   

दरम्यान, याचिकाकर्तीचा पती मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली. 
 

Web Title: Marathi News National caste decided birth can not be changed marriage supreme court