परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

पहिल्या वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत रागमौनिकाला कॉपी करताना पकडले होते. त्यानंतर ती खूप अस्वस्थ होती. या अस्वस्थेतून तिने वसतिगृहाच्या खोलीत जाऊन गळफास घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

चेन्नई : सत्यबमा खासगी विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती विद्यार्थिनी पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी खासगी वसतिगृहाच्या मालमत्तेची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. 

रागमौनिका असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती हैदरबादची रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. महाविद्यालयातील पहिल्या वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत रागमौनिकाला कॉपी करताना पकडले होते. त्यानंतर ती खूप अस्वस्थ होती. या अस्वस्थेतून तिने वसतिगृहाच्या खोलीत जाऊन गळफास घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यापीठाच्या स्टाफने मला खूप अपमानित केले, असे तिने आत्महत्येपूर्वी सहकारी विद्यार्थिनींना सांगितले होते. त्यामुळे ती खूप नाराज झाली होती. या नाराजीतूनच तिने हे कृत्य केले असावे, असा दावा पोलिसांनी केला आहे. 

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्या विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: marathi news national Chennai Satyabama University student caught cheating hangs herself