पाटीदार आरक्षण द्यायला काँग्रेस तयार : हार्दिक पटेल

वृत्तसंस्था
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

"सत्तेवर आल्यावर पाटीदार समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक सादर केले जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. आम्ही काँग्रेसला मते द्या असे कधीही सांगितले नाही. आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा देणार असून, भाजपविरोधी लढणार आहोत''.       

                                                      (हार्दिक पटेल)

नवी दिल्ली : "गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यास पाटीदार समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाईल, यासाठी काँग्रेसने सहमती दर्शवली आहे", असे पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलने सांगितले.

अहमदाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिकने ही माहिती दिली. हार्दिक पटेल म्हणाला, काँग्रेसने आमची मागणी समजून घेतली आहे आणि त्यांनी सत्तेत आल्यावर पाटीदार समाजाला आरक्षण देऊ असे सांगितले आहे. आम्ही या निवडणुकीत तिकीट मिळावे, अशी कोणतीही मागणी केलेली नाही. मी येत्या अडीच वर्षात कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. 

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पटेल याने गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला लक्ष्य करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्याने भाजपवर वेळोवेळी निशाणा साधत आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेससोबत जाणार की स्वत: निवडणूक लढवणार हे चित्र अस्पष्ट होते. 

यावर स्पष्टीकरण देत तो म्हणाला, "सत्तेवर आल्यावर पाटीदार समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक सादर केले जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. आम्ही काँग्रेसला मते द्या असे कधीही सांगितले नाही. आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा देणार असून, भाजपविरोधी लढणार आहोत''.

Web Title: marathi news national Congress has agreed to qive quotas to Patidars says Hardik Patel