'पद्मावत'च्या बंदीविरोधात निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

हरियाना, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये पद्मावतला बंदी घालण्यात आली. या चारही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

नवी दिल्ली : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला यापूर्वी विविध राजपूत संघटनांनी केलेल्या विरोधानंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. तरीदेखील पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय काही राज्य सरकारांनी घेतल्यानंतर भन्साळींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडून या याचिकेवर उद्या (गुरुवार) सुनावणी केली जाणार आहे. पद्मावत चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, तत्पूर्वी हरियाना, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये पद्मावतला बंदी घालण्यात आली. या चारही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. भन्साळींनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी सांगितले, की ''सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार अनेक बदल चित्रपटामध्ये करण्यात आले आहेत''. 

मागील वर्षी 30 डिसेंबर रोजी सेन्सॉर बोर्डाने यू/ए प्रमाणपत्र देण्यासाठी चित्रपटाचे नाव आणि चित्रपटातील घूमर गाण्यामध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सेन्सॉर बोर्डाच्या या सूचनेनंतर भन्साळींनी चित्रपटात बदल केले आहेत. तरीदेखील या चार राज्यांत बंदी आणल्याने भन्साळींनी न्यायालायात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, भन्साळींच्या या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    

Web Title: Marathi news National Entertainment Padmaavat producer moves Supreme Court challenging screening ban by some states