'पद्मावती'वरून 'पद्मावत' चित्रपटाला सुचवले 26 कट

वृत्तसंस्था
शनिवार, 30 डिसेंबर 2017

सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर भन्साळींनी चित्रपटाचे नाव बदलण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे नाव बदलून चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या चित्रपटाला सातत्याने होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'पद्मावती'वरून 'पद्मावत' असे केले जाणार आहे. सेन्सॉर बोर्डाने याबाबतचे आदेश दिले आहेत.

सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर भन्साळींनी चित्रपटाचे नाव बदलण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे नाव बदलून चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या आवश्यक बदलानंतर चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच नावासोबतच चित्रपटातील घूमर गाण्यामध्येही बदल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सतीच्या प्रथेला पाठिंबा नसल्याबाबतचे सूचनापत्र चित्रपटापूर्वी दाखवण्यात यावे, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

'पद्मावती' चित्रपटात राणी पद्मिनी आणि मुघल शासक खिलजी यांच्यातील संबंध दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे राजपूत कर्णी संघटनेसह अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी 1 डिसेंबर रोजी होणारे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढील तारीख कधी जाहीर होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news national entertainment Sanjay Leela Bhansalis Padmavati cleared by CBFC after modifications