लालूंच्या शिक्षेला 'मुहूर्त' मिळेना !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

आत्तापर्यंत तीनवेळेस लालूंची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवरील सुनावणी आज पुन्हा टळली. आता त्यांना उद्या (शनिवार) शिक्षा सुनावली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी दोनदा लालूंच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी टळली आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या वकीलांनी रांचीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष (सीबीआय) न्यायालयात लालूंना कमीत कमी शिक्षा सुनावली जावी, अशी याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये लालू म्हणाले, ''माझा या गैरव्यवहारात कोणताही सहभाग नाही. तसेच माझे वय जास्त असल्याने प्रकृती सतत अस्वस्थ असते, त्यामुळे मला कमीत कमी शिक्षा द्यावी''.

न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना 23 डिसेंबरला दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना 3 डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र, तेव्हा त्यांच्या शिक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आजही न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली नसून, त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.  

दरम्यान, आत्तापर्यंत तीनवेळेस लालूंची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे उद्या त्यांना शिक्षा सुनावली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news national Fodder scam Sentencing on Saturday Lalu Prasad pleads for minimum punishment