'आयएनएस कलवरी' नौदलात दाखल

वृत्तसंस्था
Thursday, 14 December 2017

कलवरीच्या निर्मितीमध्ये मदत करणाऱ्या फ्रान्सचे मी आभार मानतो. भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीचे हे उत्तम उदाहरण आहे. टायगर शार्क म्हणजेच कलवरी भारतीय नौदलाच्या ताकदीमध्ये नक्कीच भर टाकेल. (पंतप्रधान नरेंद्र मोदी)

मुंबई : नौदलाच्या ताफ्यात तब्बल 15 वर्षांनंतर नवीन पाणबुडी दाखल झाली आहे. 'आयएनएस कलवरी' असे त्या पाणबुडीचे नाव आहे. या पाणबुडीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ''आयएनएस कलवरीचे लोकार्पण करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे'', असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पाकिस्तान आणि चीनकडून समुद्रमार्गे होणारी घुसखोरी मोडून काढण्यासाठी स्वदेशी बनावटीची 'कलवरी' आजपासून नौदलात दाखल झाली आहे. या पाणबुडीमध्ये विशेष अशी क्षमता असणार आहे. या पाणबुडीचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींची अवस्था योग्य नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेता तब्बल 15 वर्षानंतर भारतीय नौदलात नवीन पाणबुडी दाखल करण्यात आली. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, ''कलवरीच्या निर्मितीमध्ये मदत करणाऱ्या फ्रान्सचे मी आभार मानतो. भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीचे हे उत्तम उदाहरण आहे. टायगर शार्क म्हणजेच कलवरी भारतीय नौदलाच्या ताकदीमध्ये नक्कीच भर टाकेल''. तसेच हिंद महासागराबाबत भारत सतर्क असून, या क्षेत्रातील शांततेसाठी भारतीय नौदल प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले. 

कलवरी या पाणबुडीवर सुमारे 120 दिवस विविध प्रकारच्या सागरी चाचण्या घेण्यात आल्या. पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करणे, पाण्यात पाणसुरुंग पेरणे यांसारख्या क्षमता या पाणबुडीमध्ये असणार आहेत. 

कलवरी ही पाणबुडी डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. कलवरीसारख्या आणखीन सहा पाणबुड्या भारतीय नौदलात लवकरच दाखल होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national Indian Navy INS Kalvari Commissioned By Pm Narendra Modi Deadliest First Made In India Scorpene Class Submarine India