काश्‍मिरातील 11,300 तरुणांना मूळ प्रवाहात आणणार : डीजीपी वैद्य

यूएनआय
सोमवार, 1 जानेवारी 2018

"सीआयडीने चालू वर्षात पोलिसांकडून होणारी पासपोर्ट पडताळणी, एलओसीचे परमिट तसेच, व्यापारासंदर्भातील अनेक परवानग्यांना मान्यता दिली आहे. माफी योजनेअंतर्गत 2008 मध्ये 104, 2009 मध्ये 634, 2010 मध्ये 744 आणि 2014 मध्ये 4327 तर, 2016-17 मध्ये अंदाजे 5,500 प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.'' 

श्रीनगर : फुटीरवादी, दहशतवादी संघटनांकडे आकर्षिल्या गेलेल्या जम्मू आणि काश्‍मीरमधील सुमारे 11 हजार 309 तरुणांना माफी योजनेअंतर्गत मूळ प्रवाहात आणले जाणार असल्याची माहिती काश्‍मीरचे पोलिस महासंचालक (डीजीपी) डॉ. एस. पी. वैद्य यांनी दिली. 

येथील पत्रकारांशी ते बोलत होते. वैद्य म्हणाले, ""सीआयडीने चालू वर्षात पोलिसांकडून होणारी पासपोर्ट पडताळणी, एलओसीचे परमिट तसेच, व्यापारासंदर्भातील अनेक परवानग्यांना मान्यता दिली आहे. माफी योजनेअंतर्गत 2008 मध्ये 104, 2009 मध्ये 634, 2010 मध्ये 744 आणि 2014 मध्ये 4327 तर, 2016-17 मध्ये अंदाजे 5,500 प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.'' 

सीआयडीने चालू वर्षात पासपोर्टशी संबंधित 1,30,011, नोकरी 20,768, एलओसी परवाने 2163 तर, एलओसी व्यापाराशी संबंधित 396 प्रकरणांची पडताळणी केली आहे. ज्या तरुणांना माफी देण्यात आली आहे, त्यांना लवकरच कोणताही व्यवसाय, पासपोर्ट काढण्यासाठी तसेच, सरकारी नोकरीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्रदान केले जाणार असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.

काश्‍मीरप्रश्नी केंद्र सरकारने नियुक्त केलेले प्रतिनिधी दिनेश्वर शर्मा यांनी तरुणांच्या माफीबाबतची शिफारस केली होती. ती मान्य करत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दगडफेकीच्या घटनेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या तरुणांना माफ करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. 

तरुणांच्या विकासासाठी पाच कोटी 

पोलिस व जनतेमधील संवाद वाढावा हा या योजनेमागील हेतू असून, त्याला आमचे प्राधान्य राहील, असे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले. याबाबत चालू वर्षात झालेल्या बैठकीत मूळ प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांच्या विकासासाठी पाच कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहितीही वैद्य यांनी दिली.

Web Title: marathi news national jammu kashmir news DGP vaidya