'जेएनयू'मध्ये सर्व कोर्सेससाठी 75 टक्के हजेरी बंधनकारक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

बीए, एमए, एमएससी, एमटेक, एमपीएच, पीजी डिप्लोमा आणि पीएचडी यांसारख्या सर्व प्रकारच्या अर्धवेळ कोर्सेसाठी कमीत कमी 75 टक्के हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रत्येक कोर्सेससाठी 75 टक्के हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठातील संबंधित प्राध्यापकांना हजेरीसाठी पत्रक दिले गेले आहे. त्या हजेरीपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव आणि सहीसह विद्यापीठाच्या मध्यवर्ती कार्यालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

'हजेरी रेकॉर्डप्रमाणपत्र समिती'ने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विद्यापीठाकडून हजेरी बंधनकारक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर यावर विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या विचारानंतर नवी नियमावली आणण्यात आली. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले. बीए, एमए, एमएससी, एमटेक, एमपीएच, पीजी डिप्लोमा आणि पीएचडी यांसारख्या सर्व प्रकारच्या अर्धवेळ कोर्सेसाठी कमीत कमी 75 टक्के हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. 

तसेच या परिपत्रकात वैद्यकीय कोर्सेससाठी उपस्थित नसल्यास संबंधित विद्यार्थ्याला कमीत कमी 60 टक्के हजेरी गरजेची असणार आहे. पण त्यासाठी वैद्यकीय कागदपत्रे प्रमाणित आणि पडताळणी ही मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची गरज लागणार आहे.  

Web Title: Marathi news national JNU makes 75 percentage attendence mandatory for all courses, students to hold protest