लष्करात आहात, तर मरावे लागणारच : भाजप खासदार

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

''लष्करात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाहीत''

(खासदार नेपालसिंह​)

श्रीनगर : भारतीय लष्करातील जवान आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण करत असतात. त्यांचा सन्मान व्हावा, अशी देशातील सर्वांचीच भावना असते. मात्र, भाजपचे खासदार यांनी जवानांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून जवानांचा अपमान केला आहे. ते म्हणाले, ''लष्करात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाहीत'', असे संतापजनक वक्तव्य खासदार नेपालसिंह यांनी केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव दलाच्या 185 बटालियनच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ''सैन्यात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाहीत. तसेच गल्लीतील भांडणाचे उदाहरण दिले. गावात जेव्हा भांडणे होतात. त्यावेळीही मारामारीत किमान एकतीर व्यक्ती जखमी होतोच, असेही ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून नेपालसिंह प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव करत ते म्हणाले, माझ्या विधानाचा तो अर्थ नव्हता. जवानांचा अपमान होईल, असे कोणतेही विधान मी केलेले नाही.

दरम्यान, नेपालसिंह यांच्या वक्तव्यामुळे सगळीकडे टीका केली जात आहे. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. त्यानंतर नेपालसिंह यांनी त्यांच्या वक्तव्यावरून लगेचच सारवासारव करत याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Web Title: marathi news national news BJP MP nepal singh controversial statement on martyrs