पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर सहावीतील विद्यार्थिनीचा हल्ला

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

''ऋतिकच्याच शाळेत शिकणाऱ्या सहावीतील एका विद्यार्थिनीने ऋतिकला स्वच्छतागृहात नेले तिथे तिने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांना याबाबतची माहिती बुधवारी दुपारी देण्यात आली. पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने भोसकण्यात आले''.

हरेंद्र कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक  

लखनौ : पहिलीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच्याच शाळेतील सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. हा हल्ला शाळेतील स्वच्छतागृहात करण्यात आला. 

ऋतिक शर्मा असे पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  ऋतिक हा त्रिवेनीनगर येथील ब्राइटलँड महाविद्यालयात प्राथमिक शिक्षण घेत आहे. ऋतिकला शाळेतील शिक्षक बोलवत असल्याचे सांगत त्या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याला वर्गाबाहेर बोलावले. त्यावेळी तिने चाकूने ऋतिकच्या पोटावर हल्ला केला. तसेच चाकूने त्याला भोसकलेही. त्यामुळे ऋतिक गंभीर जखमी झाला. त्यानंतर ऋतिकला किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. 

''ऋतिकच्याच शाळेत शिकणाऱ्या सहावीतील एका विद्यार्थिनीने ऋतिकला स्वच्छतागृहात नेले तिथे तिने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांना याबाबतची माहिती बुधवारी दुपारी देण्यात आली. पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने भोसकण्यात आले'', अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक हरेंद्र कुमार यांनी दिली.

''संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम 324 आणि 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सदर घटनेचे सीसीटीव्ही फूटेज शाळेकडून घेतले आहे. मात्र, शाळेच्या स्वच्छतागृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. विद्यार्थ्याला उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्हाला याबाबतची आणखी माहिती मिळू शकेल'', असे वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर यांनी सांगितले. 

 

Web Title: Marathi News National news crime news Class I student attacked with sharp weapon in school washroom