सौदी अरेबियातून एसएमएसवरून मुस्लिम महिलेला तलाक

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

''माझ्या सासरच्या मंडळींकडून गाडीची मागणी केली जात होती. मला माझ्या पतीकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यानंतर मला त्यांच्याकडून एक एसएमएस प्राप्त झाला, त्यामध्ये त्यांनी मला घटस्फोट देत असल्याचे सांगितले''.

- पीडित मुस्लिम महिला

सुल्तानपूर : देशभरात तिहेरी तलाकचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील एका मुस्लिम महिलेला एसएमएसच्या माध्यमातून घटस्फोट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे संबंधित विवाहित महिलेच्या पतीने सौदी अरेबियातून तिला एसएमएस करून घटस्फोट दिला आहे.

सौदी अरेबियातील नंदौली येथे पीडित महिलेचा पती नोकरीस आहे. त्याने 'रुबी तलाक, रूबी तलाक, रूबी तलाक' अशा आशयाचा एसएमएस करत तिला घटस्फोट दिला आहे. 

''माझ्या सासरच्या मंडळींकडून गाडीची मागणी केली जात होती. मला माझ्या पतीकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यानंतर मला त्यांच्याकडून एक एसएमएस प्राप्त झाला, त्यामध्ये त्यांनी मला घटस्फोट देत असल्याचे सांगितले'', असे पीडित महिलेने सांगितले. 

''मला एक मुलगा आहे. आता मला कसे जगायचे हा प्रश्न समोर आहे. आता हेच माझे घर आहे, मी येथून कोठेही जाणार नाही'', असेही ती म्हणाली.

''हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून घडत आहे. तिला सासरच्या मंडळींकडून सातत्याने त्रास दिला जात आहे. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढले. तिच्या पतीकडून तिला तलाकचा एसएमएस पाठवण्यात आला आहे. आम्ही याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, आमच्यासाठी आता घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे'', पीडिताचे वडीलांनी सांगितले.

दरम्यान, तिहेरी तलाकला लगाम लावण्यासाठी 'तिहेरी तलाकविरोधी विधेयक' लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकाला लोकसभेत मंजूरी देण्यात आली होती. काँग्रेसने या विधेयकात काही बदल सुचवले होते. मात्र, सत्ताधारी भाजपने यामध्ये कोणतेही बदल न केल्याने संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत हे विधेयक रखडले.

Web Title: marathi news national news divorce given through SMS from Saudi Arabia