'घूमर'मध्ये दिसणार नाही दीपिकाची 'कमर'

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

चित्रपटातील घूमर या गाण्यामध्ये नृत्य करताना दीपिकाची कंबर दिसत आहे. त्यामुळे हे दृश्य राणी पद्मावतीच्या प्रतिमेच्या विरोधी असल्याने या गाण्यात आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या सुचनेनंतर गाण्यामध्ये बदल करण्यास दिग्दर्शक भन्साळी तयार झाले.

मुंबई : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या 'घूमर' गाण्यातील नृत्यामध्ये दीपिकाची कंबर दिसत आहे. मात्र, यामध्ये बदल करण्यात आला असून, कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने तिची कंबर लपवली गेली आहे. याबाबत सेन्सॉर बोर्डाने सूचना केल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.

भन्साळी यांच्या 'पद्मावती' या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता रणवीर सिंह आणि शाहीद कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. 'पद्मावती'ला सातत्याने होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली होती. तसेच सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या आवश्यक बदलानंतर चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. याशिवाय नावासोबतच चित्रपटातील घूमर गाण्यामध्येही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय सतीच्या प्रथेला पाठिंबा नसल्याबाबतचे सूचनापत्र चित्रपटापूर्वी दाखवण्यात यावे, असेही यामध्ये सांगण्यात आले होते.

त्यानुसार या चित्रपटाचे नाव 'पद्मावती'वरून 'पद्मावत' करण्यात आले. तसेच चित्रपटातील घूमर या गाण्यामध्ये नृत्य करताना दीपिकाची कंबर दिसत आहे. त्यामुळे हे दृश्य राणी पद्मावतीच्या प्रतिमेच्या विरोधी असल्याने या गाण्यात आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या सुचनेनंतर गाण्यामध्ये बदल करण्यास दिग्दर्शक भन्साळी तयार झाले.

दरम्यान, संपूर्ण गाण्याच्या नृत्यात बदल केल्यास कोरिओग्राफी बिघडेल, अशी शक्यता असल्याने ग्राफिक्सच्या माध्यमातून दीपिकाची कंबर लपवली गेली आहे. त्यामुळे आता या चित्रपटातील घूमर गाण्यात दीपिकाची कंबर दिसणार नाही. 

Web Title: MARATHI NEWS NATIONAL NEWS ENTERTAINMENT Deepika Padukones belly to be covered through computer graphics in Ghoomar song of movie Padmaavat