गुजरात विधानसभेत भाजप आमदाराला पट्ट्याने मारहाण

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी मध्यस्थी करण्यासाठी भाजप आमदार जगदीश पांचाळ हे गेले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या काँग्रेस आमदार प्रताप दुधात यांनी त्यांना चक्क कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच त्यांनी सभागृहातील माईकची तोडफोडही केली. 

अहमदाबाद : विधानसभेत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची विधेयके मांडली जातात. चर्चेअंती या विधेयकावर निर्णय घेतल्यानंतर या विधेयकाचे रूपांतर कायद्यात केले जाते. मात्र, हे होत असताना सभागृहातील सदस्यांमध्ये बऱ्याचदा शाब्दिक चकमकही होत असते. मात्र, गुजरात विधानसभेत आज (बुधवार) विचित्र प्रकार घडला. सभागृहात बोलायला दिले जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस आमदारांनी विधानसभेत तुफान राडा घातला. तसेच त्यांनी सभापतींच्या माईकची तोडफोड केली. यातील काँग्रेसच्या एका आमदाराने भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने मारहाणही केली.

गुजरात विधानसभेचे सभापती राजेंद्र एस. त्रिवेदी हे नेहमी सत्ताधारी भाजप आमदारांनाच बोलण्याची संधी देत असतात, असा आक्षेप काँग्रेस आमदारांनी घेतला होता. त्यानंतर जेव्हा सभागृहात भाजपचे आमदार बोलायला उभे राहिले, तेव्हा काँग्रेस आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी मध्यस्थी करण्यासाठी भाजप आमदार जगदीश पांचाळ हे गेले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या काँग्रेस आमदार प्रताप दुधात यांनी त्यांना चक्क कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच त्यांनी सभागृहातील माईकची तोडफोडही केली. 

दरम्यान, प्रताप दुधात हे काँग्रेसचे निकोल मतदारसंघाचे आमदार असल्याची माहिती मिळत आहे. दुधात यांनी पांचाळ यांना पट्ट्याने मारहाण केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विक्रम माडम यांनी माईक तोडला, तर राजुलाचे आमदार अंबरीश डेर यांनीही भाजप आमदाराला मारहाण केली. 

Web Title: Marathi News National News Gujrat Assembly Congress MLA BJP MLA Clashes