गडकरींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसकडून माफीची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

''भाजप नेत्यांच्या डोक्‍यात सत्तेची नशा गेली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत''.

सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाला एक इंचही जमीन देणार नसल्याचे काल (बुधवारी) वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने गडकरींच्या माफीनाम्याची मागणी केली आहे. 

मुंबईतील एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, की दक्षिण मुंबईत नौदलाच्या अधिकाऱ्यांना घरांसाठी जागा हवी आहे. त्यासाठी काही अधिकारी माझ्याकडे आले होते. आता त्यांनी माझ्याकडे येऊ नये. कारण मी तुम्हाला एक इंचही जागा देणार नाही. तरंगत्या हॉटेलपेक्षा, सीमेवर लक्ष ठेवा, पाकिस्तानच्या सीमेवर जा, असे विधान गडकरींनी केले होते. 

त्यानंतर आज त्यांच्या या विधानावर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे. गडकरींनी नौदलाबाबत विधान करून भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करत आहे. तसेच त्यांनी या विधानावर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

तसेच सावंत पुढे म्हणाले, भाजप नेत्यांच्या डोक्‍यात सत्तेची नशा गेली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत.

Web Title: Marathi news national news Maharashtra Congress seeks apology from Gadkari for insulting Navy