डोंगर फोडून 'त्याने' मुलांना पाठवले शाळेत

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

''मी कधीही शिक्षण घेतले नाही. मात्र, मी माझ्या मुलांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत आहे. मुले शाळेत जाताना खडतर प्रवास करत परिसर पार करत असतात तेव्हा त्यांना खूप अडचण होत असे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले''.  

- जालंदर नायक​

कंधमळ : शिक्षण घेण्यासाठी असंख्य विद्यार्थी परिस्थितीशी सामना करत असतात. आलेल्या सर्व संकटांवर मात करत शिक्षण घेत असतात. असाच प्रकार ओडिशात घडला. ओडिशातील जालंदर नायक याने डोंगर फोडून मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता तयार केला. कंधमल जिल्ह्यातील डोंगर एकट्याने फोडत सुमारे 8 किमी लांबीचा रस्ता तयार केला. 

नायक हे मागील दोन वर्षांपासून दररोज आठ तास रस्ते बांधणीसाठी काम करत आहेत. येथील गुमसही या गावाला फुलबनी येथील मूळ गावी कंधमल जिल्ह्याला जोडण्याचे त्याने ठरवले. कारण यादरम्यान असलेल्या अडचणींमुळे त्याच्या मुलांना शाळेत जाण्यास अडथळा येत होता. नायकने मुलांना शाळेत जाता यावे आणि त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी त्याने डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचे ठरवले आणि विशेष म्हणजे त्याने मुलांसाठी रस्ता तयारही केला. 

याबाबत गटविकास अधिकारी एस. के. जेना यांनी सांगितले, की ''नायकला आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. तो जंगल परिसरातील एका घरात राहतो. त्याचे जीवनमान व्यतित करण्यासाठी त्याला शहरात राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्याने शहरात येण्यास नकार दिला. त्याला सर्वोतपरी मदत करण्याचे आमचा विचार आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. त्याच्या या विशेष अशा कामाचा सन्मान करायचा की नाही याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही''. 

भाजीपाला विक्रेता नायकने सांगितले, की ''मी कधीही शिक्षण घेतले नाही. मात्र, मी माझ्या मुलांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करत आहे. मुले शाळेत जाताना खडतर प्रवास करत परिसर पार करत असतात तेव्हा त्यांना खूप अडचण होत असे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले''.  

Web Title: Marathi news national news Odisha man carves mountains to send kids to school