तुम्ही माझा व्यवसाय उद्ध्वस्त केला : मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

''थकीत कर्जवसुली करण्याच्या घाईत तुम्ही मी दिलेल्या ऑफरकडे दुर्लक्ष करत प्रकरण सार्वजनिक केले. यामुळे आमचा ब्रँड आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून, कर्जफेडीचे सर्व मार्ग बंद केले आहेत''.

- नीरव मोदी

नवी दिल्ली : फरारी उद्योगपती नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत त्याच्यावरील सर्व आरोप खोडून काढत पंजाब नॅशनल बँकेला पत्र लिहिले. त्याने या पत्रात ''थकीत कर्जवसुली करण्याच्या घाईत तुम्ही मी दिलेल्या ऑफरकडे दुर्लक्ष करत प्रकरण सार्वजनिक केले. यामुळे आमचा ब्रँड आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून, कर्जफेडीचे सर्व मार्ग बंद केले आहेत'', असे सांगितले. 

PNB

मोदीने त्याच्या वकीलामार्फत हे पत्र पीएनबीला लिहिले आहे. याबाबत मोदीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले, की पंजाब नॅशनल बँकेचे सर्व व्यवहार कागदपत्रांनुसार योग्य आहेत. मात्र, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोदींवर जे आरोप केलेले आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. दरम्यान, त्यांना पुढील कायदेशीर लढाईविषयी विचारले असता ते म्हणाले, अद्याप कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे यात कोणतीही रणनीति नाही. जेव्हा याबाबत आरोपपत्र दाखल केले जाईल, तेव्हा याबाबतची रणनीति आखली जाईल. 

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा व्यावसायिक नीरव मोदीने याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल होण्यापूर्वीच देशातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेची तक्रार 'सीबीआय'कडे 29 जानेवारी रोजी वर्ग झाली. पण नीरव मोदी एक जानेवारी रोजीच देशातून बाहेर गेला होता. 
 

Web Title: Marathi News National News PNB Scam Nirav Modi 11 crores Scam