जया बच्चन यांना 'सपा'कडून राज्यसभेसाठी उमेदवारी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

जया बच्चन उत्तरप्रदेशमधून सलग तीनवेळेस समाजवादी पक्षाकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची राज्यसभा खासदारकीची मुदत 3 एप्रिलला संपत आहे. सपाच्या मदतीने त्यांचे राज्यसभेचे पुढील सदस्यत्व कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. 

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांना समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली. उत्तरप्रदेश राज्यात समाजवादी पक्षाच्या आमदारांचे संख्याबळ पाहता जया बच्चन यांची राज्यसभेवरील नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

Rajyasabha

उत्तरप्रदेशमध्ये 23 मार्च रोजी राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणुका होत आहे. उत्तरप्रदेश विधानसभेच्या 403 जागांपैकी समाजवादी पक्षाचे 47 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 38 आमदारांची गरज आहे. त्यामुळे बहुमतासाठी लागणारे संख्याबळ समाजवादी पक्षाकडे असल्याने जया बच्चन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जया बच्चन उत्तरप्रदेशमधून सलग तीनवेळेस समाजवादी पक्षाकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची राज्यसभा खासदारकीची मुदत 3 एप्रिलला संपत आहे. सपाच्या मदतीने त्यांचे राज्यसभेचे पुढील सदस्यत्व कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी सपा नेते नरेश अग्रवाल यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, अग्रवाल यांच्या नावाचा विचार समाजवादी पक्षाकडून करण्यात आला नाही. त्यामुळे जया बच्चन यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 

Web Title: Marathi News National News Political News Jaya Bachchan got candidacy for Rajya Sabha