...तर संसदच बंद करा : सोनिया गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 मार्च 2018

''जर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नसेल तर संसद कशासाठी सुरु आहे. ती बंद करा आणि आम्ही घरी जातो''. 

- सोनिया गांधी, माजी अध्यक्षा, काँग्रेस

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर (एनडीए)वर शुक्रवारी जोरदार टीका केली. संसदेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या, ''जर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नसेल तर संसद कशासाठी सुरु आहे. ती बंद करा आणि आम्ही घरी जातो''. 

PARLIAMENT

'इंडिया टुडे कॉन्क्लेव 2018' आयोजित कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ''भीती आणि धमकी हा आजचा आदेश झाला आहे. सध्या देशात धार्मिक तेढ वाढत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण केले जात आहे. सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नसेल तर संसदच बंद का केली जात नाही. त्यामुळे आम्ही घरी जाऊ शकू. आताचे भाजप सरकार वायपेयींसारखे संसद आणि त्याच्या कार्यवाहीचा आदर करत नाही''. तसेच त्या पुढे म्हणाल्या, ''आपल्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे. आज आपण सगळे प्रतिगामी दृष्टीच्या नेतृत्वात आहोत''.

दरम्यान, सोनिया गांधींनी भाजप सरकारच्या धोरणांवरही टीका केली. आपली सध्या न्यायव्यवस्था संभ्रमात आहे. माहिती अधिकार हा देशात पारदर्शकता यावी, यासाठी आणण्यात आला. मात्र, सध्या कायदा 'कोल्ड स्टोरेज'मध्ये गेला आहे. 

Web Title: Marathi News National News Political News Parliament shut down says Congress Leader Sonia Gandhi