सुरेश प्रभूंकडे नागरी विमान मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

''राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर सुरेश प्रभूंची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे''.

- प्रवक्ते, राष्ट्रपती भवन

नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) कोणतेही मंत्रिपद न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पक्षाचे नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू आणि राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनी राजीनामा दिला. गजपती राजू यांच्या राजीनाम्यानंतर वाणिज्यमंत्री असलेले सुरेश प्रभू यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. 

Rashtrapati Bhavan

2018-19 या वर्षासाठी अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशच्या विकासासाठी निधी दिला गेला नाही. तसेच चंद्राबाबू नायडू यांच्याकडून आंध्रप्रदेशला विशेष दर्जा दिला जावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, ही मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावली होती. त्यामुळे नाराज झालेल्या चंद्राबाबू नायडूंनी एनडीएच्या कॅबिनेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर सुरेश प्रभूंची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रपती भवनाचे प्रवक्त्यांनी दिली.  
 

Web Title: Marathi News National News Political News Suresh Prabhu Get Additional Charge of Aviation Ministry