...पण 'टीडीपी' 'एनडीए'सोबतच

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

''आम्ही घटक पक्ष म्हणून एनडीएसोबत यापुढेही असणार आहोत. मात्र, आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही मंत्रिपद घेणार नाही. या निर्णयात मला काहीही चुकीचे वाटत नाही''.

- वाय. एस. चौधरी, नेते, तेलुगू देसम पक्ष 

नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता 'टीडीपी'चे केंद्रात मंत्री असलेले नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र, टीडीपी एनडीएसोबत राहणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. 

आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा, अशी मागणी चंद्राबाबू नायडू यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र, केंद्राने चंद्राबाबू यांची मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे चंद्राबाबू एनडीएच्या निर्णयावर नाराज होते. या नाराजीतच त्यांनी काल (बुधवार) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाचे केंद्रात मंत्री असलेले गजपती राजू आणि चौधरी यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे आज दिले आहेत. 

MODI-chandrababu

''आम्ही घटक पक्ष म्हणून एनडीएसोबत यापुढेही असणार आहोत. मात्र, आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही मंत्रिपद घेणार नाही. या निर्णयात मला काहीही चुकीचे वाटत नाही'', असे वाय. एस. चौधरी यांनी सांगितले. 

दरम्यान, तेलुगू देसम पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पंतप्रधानांनी नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून, या चर्चेदरम्यानच एनडीएमधून बाहेर न पडण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Marathi News National News Political News TDP Continue with NDA says Y S Chowdhary