आंध्रच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार : जेटली

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

"आम्ही आंध्रप्रदेशसाठी वेगळे पॅकेज लागू करणार आहोत. याचा अर्थसंकल्पाशी काहीही संबंध नाही. तसेच आम्ही आंध्रच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत''.

- अरूण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांमध्ये वाढत चाललेला तणाव मावळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशाच्या विकासासाठी निधी दिला नसल्याने नाराज झालेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले. त्यानंतर जेटलींनी यावर भाष्य केले. "आम्ही आंध्रप्रदेशसाठी वेगळे पॅकेज लागू करणार आहोत. याचा अर्थसंकल्पाशी काहीही संबंध नाही. तसेच आम्ही आंध्रच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत'', असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले.

arun jaitley

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेटलींनी हे स्पष्ट केले. 1 फेब्रुवारी रोजी 2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प जेटली यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी कोणतीही मोठी योजना किंवा भरघोस पॅकेज जाहीर केले गेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जेटलींचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. जेटली म्हणाले, ''आंध्र प्रदेशला विशेष असे पॅकेज जाहीर केले जाणार आहे. अर्थसंकल्पाशी याचा काहीही संबंध नाही. तसेच आम्ही आंध्रच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत".

chandrababu naidu

दरम्यान, एनडीएमधील असंतुष्टांमध्ये आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांची भर पडल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर नायडू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात 'चर्चा' झाल्याचा दावा सेनेकडून करण्यात आला आहे. भाजपबरोबरील संबंध तोडून येत्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर उतरावे, असा पक्षामधील मुख्य सूर असल्याचे नायडू यांनी ठाकरे यांना सांगितल्याची माहिती सेनेकडून देण्यात आली आहे.

Web Title: Marathi News National News Politics Andra Pradesh Chandrababu Naidu Arun Jaitley