सरकार 'वन मॅन शो' आणि पक्ष 'टू मॅन आर्मी' ; शत्रुघ्न सिन्हा यांची टीका

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

''सध्या केंद्रीय मंत्र्यांना खूप कमी महत्व दिले जाते. त्यामुळे आता मला असे वाटते, की सरकार 'वन मॅन शो' आणि पक्ष 'टू मॅन आर्मी' आहे. त्यामुळे आता सर्वानुमते निर्णय घेण्याची वेळ आली आहे''.

- भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली : भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सरकार 'वन मॅन शो' आणि पक्ष 'टू मॅन आर्मी' आहे. असे मलाच नाही तर सर्वांना वाटते.''

मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ''सध्या केंद्रीय मंत्र्यांना खूप कमी महत्व दिले जाते. त्यामुळे आता मला असे वाटते, की सरकार 'वन मॅन शो' आणि पक्ष 'टू मॅन आर्मी' आहे. त्यामुळे आता सर्वानुमते निर्णय घेण्याची वेळ आली आहे''. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीसाठी रविवारी शत्रुघ्न सिन्हा नरसिंहपूर येथे गेले होते. याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा चार दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले होते.

shatrughan sinha

सिन्हा म्हणाले, देशातील बरेचसे लोक 80 टक्के मंत्र्यांना ओळखतही नाहीत. जर ओळखत असतील तर ते मानत नाहीत आणि जर मानत असतील तर ओळखत नसतील. असे मंत्री काही कामाचे नाहीत. अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या सरकारमध्ये आम्हाला सर्वांची ओळख होती, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.   

दरम्यान, राजस्थानातील निवडणुकीच्या निकालानंतर  सिन्हा यांनी भाजपवर टीका केली होती. ''राजस्थानात भाजपला तिहेरी तलाक देण्यात आला. आमच्या विरोधकांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आमच्या पक्षाला जोरदार झटका दिला'', असे ते म्हणाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News National News Politics Modi Government MP Shatrughan Sinha