आता आमचे पुढचे लक्ष्य... : अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

''सध्या भाजप आणि एनडीएची 21 राज्यांत सत्ता आहे. हे सर्व नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारमुळे शक्य झाले. जोपर्यंत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार येत नाही, तोपर्यंत पक्षाचा 'सुवर्णकाळ' सुरु होणार नाही''. 

- अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

नवी दिल्ली : ''त्रिपुरा आणि नागालँडमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. येथील बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली. भाजपने ईशान्य भारतात दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी केलेल्या कामामुळेच हा विजय मिळाला आहे'', असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांगितले. तसेच ''जोपर्यंत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार येत नाही, तोपर्यंत पक्षाचा 'सुवर्णकाळ' सुरु होणार नाही'', असेही ते म्हणाले.  

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत शहा बोलत होते. ते म्हणाले, ''2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते, की पश्चिमेकडील भाग हा खूप विकसित झाला. मात्र, पूर्वेकडील भाग विकसित झाला नाही. त्यामुळे तत्काळ त्यांनी 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी' सुरु केली. मला विश्वास आहे, हा विजय त्यांच्या धोरणांचा विजय आहे. ईशान्येकडील या तीन राज्यांतील निकालानंतर हे सिद्ध झाले आहे. भाजपला त्रिपुरामध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असते, मात्र आम्ही आमच्या युती सरकारमधील लोकांना कॅबिनेटमध्ये समाविष्ट करून घेणार आहोत. भाजपने ईशान्य भारतात दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी केलेल्या कामामुळेच हा विजय मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ही तिसरी निवडणूक जिंकली असून, आता कर्नाटक आमचे पुढचे लक्ष्य आहे. या राज्यांमध्ये डाव्यांचा दारुण पराभव झाला असून, डावे आता भारतातील कोणत्याच भागासाठी योग्य नाहीत'', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''सध्या भाजप आणि एनडीएची 21 राज्यांत सत्ता आहे. हे सर्व नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारमुळे शक्य झाले. जोपर्यंत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार येत नाही, तोपर्यंत पक्षाचा 'सुवर्णकाळ' सुरु होणार नाही''. 

दरम्यान, मला व्हॉटस्अपवर एक मेसेज आला, या मेसेजमध्ये इटलीमध्ये निवडणुका होत आहेत, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्लीही उडवली. 
 

Web Title: Marathi News National News Politics News Then party will win says Amit Shah