त्रिपुरात 'माणिक' नव्हे तर भाजपचे 'सरकार' : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

काँग्रेसची प्रतिष्ठा जितकी आजपर्यंत कधी कमी झाली नाही, तितकी प्रतिष्ठा आज कमी झाली आहे. गरीब जनतेने त्यांना होत असलेल्या जखमेचे उत्तर लोकशाहीची ताकद म्हणून मतदानाच्या माध्यमातून दिले आहे. 

नवी दिल्ली : ''आम्ही ईशान्येकडील भागात तेथील परिस्थिती समजण्यासाठी मंत्री पाठवले होते. या मंत्र्यांनी जनतेचे प्रश्न समजावून घेतले. ते सर्वजण पूर्ण दिवस येथील जनतेसोबत होते. त्रिपुरात माणिक सरकार गेले असून, आता त्याजागी भाजपचे सरकार आले आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

दिल्ली येथे भाजप मुख्यालयात आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते.  ते म्हणाले, ''केरळ, बंगाल आणि कर्नाटक या राज्यांमध्ये 2 डझनहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना परिस्थितीशी लढता आले नाही. तरीदेखील आम्ही येथे शांतता प्रस्थापित केली. ईशान्येकडील लोकांना वाटत होते, की दिल्ली त्यांच्यापासून दूर आहे. मात्र, आम्ही अशी स्थिती निर्माण केली. दिल्ली आज स्वत:हून आमच्याकडे चालून ईशान्येकडील दाराजवळ आली आहे.

तसेच त्रिपुरामध्ये बहुतांश तरूण उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, मला याबाबत अचूक आकडेवारी माहित नाही. जे उमेदवार जिंकले त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. ही लोकशाहीची ताकद आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसची प्रतिष्ठा जितकी आजपर्यंत कधी कमी झाली नाही, तितकी प्रतिष्ठा आज कमी झाली आहे. गरीब जनतेने त्यांना होत असलेल्या जखमेचे उत्तर लोकशाहीची ताकद म्हणून मतदानाच्या माध्यमातून दिले आहे. 

दरम्यान, निवडणुकांमध्ये होत असलेला पराभवाला लोकशाहीत खिलाडू वृत्तीने घ्यायला हवे, असेही ते म्हणाले. 

Web Title: Marathi News National News Politics News Tripura Election BJP Government PM Narendra Modi