काँग्रेस आपल्या मानसिकतेमुळे विरोधी बाकांवर : पंतप्रधान 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

आयएएस लोक सांगतात, की जमाना आता बदलत आहे. देशाचा विकास होत आहे. आम्ही 10 कोटींची कर्जे कोणत्याही दलालांविना दिली आहेत. सध्या देशातील तरुणांना रोजगार देण्याचे काम सुरु आहे. 4 कोटी गरिब आणि मध्यवर्गीय जनतेसाठी सौभाग्य योजना आणली.

नवी दिल्ली : ''काँग्रेस आपल्या मानसिकतेमुळे विरोधी बाकांवर बसली आहे. काँग्रेसच्या सरकारसोबत आमची कोणतीही तुलना होऊ शकत नाही. तत्कालीन काँग्रेस सरकारने देशाचे तुकडे केले'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच ''काळा पैसा बाळगणाऱ्यांना अजूनही शांत झोप लागत नाही, ते अस्वस्थ आहेत'', असेही ते म्हणाले.

ससंदेत भाषणादरम्यान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''काँग्रेसकडून फक्त एकाच कुटुंबाचे गुणगान गाण्यात येत असायचे. काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता. काँग्रेसमुळे देशाचा विकास झाला नाही. काँग्रेसच्या 70 वर्षांच्या पापाची शिक्षा आज देशाला भोगावी लागत आहे. 

काँग्रेसने जेव्हा आधारकार्डची संकल्पना आणली तेव्हा त्यांच्याकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. आधारमुळे पैसे थेट संबंधित खात्यावर गेले. तसेच आधारची योग्यप्रकारे अंमलबजावणीही केली नाही. त्यांना वाटत होते, की आमचे सरकार याबाबतची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरेल. मात्र, आमच्या सरकारने योग्य अंमलबजावणी केली. आम्ही वैज्ञानिक पद्धतीने आधारचा वापर केला. मात्र, काँग्रेसने अपप्रचार केला. 

ते पुढे म्हणाले, आयएएस लोक सांगतात, की जमाना आता बदलत आहे. देशाचा विकास होत आहे. आम्ही 10 कोटींची कर्जे कोणत्याही दलालांविना दिली आहेत. सध्या देशातील तरुणांना रोजगार देण्याचे काम सुरु आहे. 4 कोटी गरिब आणि मध्यवर्गीय जनतेसाठी सौभाग्य योजना आणली.

दरम्यान, विधवा, ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर देशातील जनतेला धोका देणे बंद करा, मॅच फिक्सिंग चालणार नाही, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत होत्या.  

 

 

Web Title: Marathi News National news Politics PM Narendra Modi Congress