'आधार'नंतर 'यूआयडीएआय'कडून आता 'व्हर्च्युअल आयडी'

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

'व्हर्च्युअल आयडी' तयार करण्यासाठी नागरिकांकडे आधार क्रमांक असणे बंधनकारक आहे. त्यानंतर 'यूआयडीएआय'च्या संकेतस्थळावरून आधार कार्डच्या माहितीच्याआधारे व्हर्च्युअल आयडी तयार करता येऊ शकतो.

नवी दिल्ली : नागरिकांच्या वैयक्तिक बाबींशी निगडित 'आधार'वरील गोपनीय माहिती उघड होत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी करण्यात येत असल्याचे समोर आले. त्यानंतर आता 'युनिक आयडेंटिफिकेश अॅथोरटी ऑफ इंडिया' (यूडीएआय)ने 'लिमिटेड केवायसी'ची संकल्पना आणली. त्यानुसार 'व्हर्च्युअल आयडी'ची संकल्पना मांडण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून 'आधार'च्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर काही रकमेच्या बदल्यात आधार कार्डवरील माहिती मिळवता येऊ शकते, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने सांगितले होते. मात्र, आधार कार्डमधील माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत होता. 

त्यानंतर आता नागरिकांच्या खासगी बाबींच्या सुरक्षेचे कारण देत या नव्या क्रमांकाची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा क्रमांक 16 अंकांचा असणार आहे. आधारसाठी सध्या 12 अंकी नंबर आहे. आधारप्रमाणेच या व्हर्च्युअल आयडीचा वापर ओळखपत्र म्हणून केला जाऊ शकतो. 

'व्हर्च्युअल आयडी' तयार करण्यासाठी नागरिकांकडे आधार क्रमांक असणे बंधनकारक आहे. त्यानंतर 'यूआयडीएआय'च्या संकेतस्थळावरून आधार कार्डच्या माहितीच्याआधारे व्हर्च्युअल आयडी तयार करता येऊ शकतो.

दरम्यान, मार्च महिन्यापासून या व्हर्च्युअल आयडीची सुरवात केली जाणार असून, जून महिन्यात याची नोंदणी बंधनकारक करण्यात येणार आहे. 

Web Title: marathi news national news To protect privacy UIDAI introduces Virtual ID for Aadhaar card holders