गुजरातमध्ये पुढील सरकार काँग्रेसचेच : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 23 डिसेंबर 2017

गेल्या वीस वर्षांत भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरुद्ध मानहानीचा प्रचार चालविल्यामुळे आपण पराभूत झालो. पुढील पाच वर्षे भाजप गुजरातसाठी काम करेल आणि आपण विरोधकांची भूमिका बजावू. 
- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष 

अहमदाबाद : गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कडवी लढत दिल्याबद्दल पक्षकार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात पुढील सरकार आपला पक्षच स्थापन करेल, असा आत्मविश्‍वास आज येथे व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातमध्ये नवे नेतृत्व उदयाला आल्याचे पाहायला मिळाले, असे सांगून राहुल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, राज्यात पुढील सरकार तेच स्थापन करेल, असे नमूद केले. 

गुजरात निवडणुकीदरम्यान काही लोकांनी पक्षाच्या विरोधात काम केले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे संकेतही राहुल यांनी दिले. ते म्हणाले, की 90 टक्के लोकांनी एकत्रितपणे लढत दिली आणि त्याचा निवडणुकीत कॉंग्रेससाठी चांगला परिणाम दिसून आला. मात्र, 5 ते 10 टक्के लोकांनी काहीच मदत केली नाही. पक्ष त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल. 

पक्षकार्यकर्त्यांना खंबीर राहण्यास सांगताना राहुल म्हणाले, की गुजरातमधील निवडणुकीचे निकाल काहीही लागले असले तरी कॉंग्रेससाठी हा एक विजय आहे. कारण, पक्षाने निवडणूक लढविण्यासाठी सत्य आणि प्रेमाचा शस्त्र म्हणून वापर केला. जर कॉंग्रेस एकजूट होऊन उभी राहिली तर ती पराभूत होत नाही. निवडणुकीत आपला पराभव झाला. मात्र, आपण जिंकलो, कारण ते द्वेषाने लढले आणि त्यांच्याजवळ सर्व सामग्री होती. त्याचवेळी आमच्याकडे सत्य होते आणि आम्ही प्रेमाने लढलो. 

 

Web Title: marathi news national news rahul gandhi congress