श्रीदेवी अनंतात विलीन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

करिष्मा कपूर, काजोल, अजय देवगण, करण जोहर, जया बच्चन, ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, शक्ती कपूर, जॅकी श्रॉफ, तब्बू, सोनाली बेंद्रे, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, विद्या बालन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, सुभाष घई, रोहित शेट्टी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. 

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय लोटला. 

अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी दीडच्या सुमारास पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या ट्रकवरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीदेवींच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संपूर्ण परिसर अत्यंत भावुक झाला होता.

करिष्मा कपूर, काजोल, अजय देवगण, करण जोहर, जया बच्चन, ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, शक्ती कपूर, जॅकी श्रॉफ, तब्बू, सोनाली बेंद्रे, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, विद्या बालन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, सुभाष घई, रोहित शेट्टी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. 

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली.

दरम्यान, सुमारे साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलिस आणि एसआरपीएफने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्रीदेवींचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 

Web Title: Marathi News National News Sridevi last rites sridevi funeral