साखरेची विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 डिसेंबर 2017

यंदा चांगल्या आणि नेमक्‍या पावसामुळे ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली होती आणि शेतकऱ्यांनी सीओ-0238 वाणाचा वापर केल्याने पीकही भरघोस आले, परिणामी साखर उत्पादनातही लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे.

नवी दिल्ली : साखरेच्या विक्रमी उत्पादनाकडे यंदाच्या साखर वर्षात वाटचाल सुरू झाली असून, ऑक्‍टोबर ते डिसेंबर (2017) या पहिल्या तीन महिन्यांतच साखर उत्पादनाने 100 लाख टनांचा आकडा गाठला आहे. साखर वर्षअखेर उत्पादन 250 लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 81.50 लाख टन उत्पादन नोंदले गेले होते. 

यंदा चांगल्या आणि नेमक्‍या पावसामुळे ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली होती आणि शेतकऱ्यांनी सीओ-0238 वाणाचा वापर केल्याने पीकही भरघोस आले, परिणामी साखर उत्पादनातही लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे. देशातील साखर कारखान्यांच्या संख्येतही वाढ झाली असून, त्यांची संख्या 459 वरून 492 वर गेली आहे. डिसेंबरअखेर 1007.23 लाख टन उसाचे गाळप होऊन 100.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्यावर्षी याच काळात 826.18 लाख टन ऊस गाळप होऊन 81.34 लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत (9.85 टक्के) यंदा साखरेच्या उताऱ्यात वाढ (9.96 टक्के) नोंदली गेली. 

पहिल्या तिमाहीत यंदा महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील 179 साखर कारखान्यांत 369.61 लाख टन उसाचे गाळप झाले आणि 37.70 लाख टन साखर उत्पादन झाले. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून, तेथे 116 कारखान्यांत 328 लाख टन ऊस गाळप होऊन 33.30 लाख टन साखर उत्पादन झाले. कर्नाटकात 62 कारखान्यांत 153 लाख टन गाळपातून 15.40 लाख टन साखरनिर्मिती झाली. गुजरात चौथ्या क्रमांकावर असून, 17 कारखान्यांत 38 लाख टन गाळप होऊन तीन लाख टन साखर उत्पादन झाले आहे. अर्थात, साखर वर्ष संपतासंपता उत्तर प्रदेश साखर उत्पादनात आघाडी घेईल व प्रथम क्रमांक मिळवेल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. त्यानुसार वर्षअखेरीला उत्तर प्रदेश (100 लाख टन), महाराष्ट्र (73 लाख टन), कर्नाटक (24 लाख टन), गुजरात (11 लाख टन) असे उत्पादन अपेक्षित आहे. 

भाव कोसळण्याची शक्‍यता 

तमिळनाडूला वादळाचा तडाखा बसल्याने तेथील साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे. पुढील साखर उत्पादन आकडेवारी मार्चअखेर जारी केली जाईल, असे महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असल्याने साखरेची उपलब्धता वाढून भाव कोसळतील अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्या संदर्भात महासंघाने केंद्र सरकारला सावधगिरीचा इशारा देताना विविध उपाययोजनाही सुचविलेल्या आहेत.

Web Title: marathi news national news sugar production high