श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याला फासले काळे

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

मुखर्जी यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि काळे फासल्यानंतर तेथे एक पोस्टरही लावण्यात आले असून, या पोस्टरमध्ये लेनिनचा पुतळा तोडण्याचा बदला घेतल्याचे त्यावर लिहिलेले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.   

कोलकाता : व्लादिमीर लेनिन या रशियन राज्यक्रांतीच्या प्रणेत्यांच्या त्रिपुरा येथील पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. त्याचा बदला म्हणून कोलकाता येथील भारतीय जनसंघाचे नेते दिवंगत श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासत त्यांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सहा विद्यार्थ्यांना अटक केली.  

व्लादिमीर लेनिन यांच्या त्रिपुरातील पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. कोलकातामधील टॉलीगंज येथे केवायसी पार्कमध्ये मुखर्जी यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. आज (बुधवार) सकाळी आठच्या सुमारास मुखर्जी यांच्या पुतळ्याला काहींनी काळे फासून या पुतळ्याची नासधूस केली. ही नासधूस जाधवपूर विद्यापीठाच्या सहा विद्यार्थ्यांनी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या संशयावरून पोलिसांनी या सहाही जणांना अटक केली. यातील सहा विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थीनीचा समावेश आहे.

Syama Prasad Mookerjee Statue trying to break

तसेच मुखर्जी यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि काळे फासल्यानंतर तेथे एक पोस्टरही लावण्यात आले असून, या पोस्टरमध्ये लेनिनचा पुतळा तोडण्याचा बदला घेतल्याचे त्यावर लिहिलेले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.   

दरम्यान, या गंभीर घटनेनंतर कोलकाता भाजपने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, भाजपचे प्रदेश सचिव शंतनू वसू यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Web Title: Marathi News National News Syama Prasad Mookerjee Statue trying to break