'लष्करे'चा रुग्णालयावर गोळीबार ; 2 पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नावीदने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल मुष्ताक अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. तर कॉन्स्टेबल बाबर अहमद गंभीर जखमी झाले.

श्रीनगर : भारतीय तुरुंगात असलेल्या 'लष्कर-ए-तैयबा'च्या कैद्याने रुग्णालयावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 2 पोलिस हुतात्मा झाले असून, अनेक पोलिस जखमी आहेत. मात्र, यादरम्यान त्या कैद्याने पलायन केले. या सर्व कैद्यांना रुग्णालयात नियमित तपासणीसाठी आणताना ही घटना घडली.

नावीद असे त्या कैद्याचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आलेल्या 6 पाकिस्तानी कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी श्रीनगरमधील एका रुग्णालयात आणले होते. रुग्णालय परिसरातील हा भाग उच्च सुरक्षा यंत्रणा असलेला भाग म्हणून ओळखला जातो. नावीद या कैद्यास तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात आणले होते.

याचदरम्यान नावीदने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल मुष्ताक अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. तर कॉन्स्टेबल बाबर अहमद गंभीर जखमी झाले. या गोळीबारानंतर नावीदने घटनास्थळावरून पलायन केले. नावीद जट्ट याला 26 ऑगस्ट, 2014 रोजी दक्षिण काश्मीरातील कुलगाम येथून पकडण्यात आले होते. 

Web Title: Marathi news National News Terror Attack 2 policemen Martyr LeT Attack