मुखर्जी, वाजपेयी, मनमोहनसिंगांना सरकारी निवासस्थाने सोडावी लागणार ?

वृत्तसंस्था
रविवार, 7 जानेवारी 2018

या याचिकेवर 16 जानेवारीला सुनावणी केली जाणार असून, सर्वोच्च न्यायालयाने जर हा प्रस्ताव मान्य केला तर या सर्व दिग्गजांना सरकारी निवासस्थाने सोडावी लागणार आहेत.​

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग या माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांना सरकारी निवासस्थाने सोडावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबतचा प्रस्ताव माजी महाधिवक्ता गोपाल सुब्रमण्यम यांनी दिला आहे.

मागील वर्षी 23 ऑगस्ट, 2017 रोजी 'लोक प्रहरी' या सेवाभावी संस्थेने (एनजीओ) याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने गोपाळ सुब्रमण्यम यांची 'एमिकस क्युरी' म्हणून नियुक्ती केली होती. तसेच या एनजीओने उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानांबाबत ही याचिका दाखल केली होती.  

देशात सर्वोच्च पदे भूषवल्यानंतर त्या व्यक्तींनी सामान्य नागरिकांप्रमाणे वावरावे. त्यामुळे अशाप्रकारची सर्वोच्च पदे भूषविलेल्या नेत्यांनी सरकारी निवासस्थाने सोडायला हवी, असे सुब्रमण्यम यांनी यापूर्वी सांगितले होते.    .

दरम्यान, या याचिकेवर 16 जानेवारीला सुनावणी केली जाणार असून, सर्वोच्च न्यायालयाने जर हा प्रस्ताव मान्य केला तर या सर्व दिग्गजांना सरकारी निवासस्थाने सोडावी लागणार आहेत.

Web Title: marathi news national news Will Atal Bihari Vajpayee Pranab Mukherjee Manmohan Singh might be Lose Official Accommodation