'आप'च्या 20 आमदारांची आमदारकी होणार रद्द ?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

आपच्या 21 आमदारांवर आरोप होते. मात्र, राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचे आमदार जरनायल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ही संख्या 20 झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या शिफारशीवर राष्ट्रपती काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचा आरोप निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या सर्व आमदारांना अपात्र ठरवले असून, या 20 आमदारांची आमदारकी जाणार असल्याची शक्यता आहे.

या सर्व आमदारांनी लाभाचे पद घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या सर्व आमदारांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर गदा येणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या सर्व आमदारांना अपात्र करावे, यासाठी पत्र पाठवले आहे. राष्ट्रपतींनी याबाबत निर्णय दिल्यास दिल्लीमध्ये 20 जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर आप आमदारांच्या लाभाच्या पदाबाबत वाद सुरु होता. यासाठी दिल्लीतील वकील प्रशांत पटेल यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. ज्या आमदारांनी लाभाचे पद घेतले, अशा सर्व आमदारांना अपात्र ठरवावे, असे सांगितले होते.

त्यानंतर या सर्व आमदारांनी त्यांच्यावर झालेले आरोप रद्द करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.  

दरम्यान, यापूर्वी आपच्या 21 आमदारांवर आरोप होते. मात्र, राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचे आमदार जरनायल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ही संख्या 20 झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या शिफारशीवर राष्ट्रपती काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: Marathi News National Politics EC recommends disqualification of 20 AAP MLAs over office of profit charge