खासदार काकडेंना भाजपची 'समज' ; भविष्यवाणीची भाजप नेतृत्वाकडून गंभीर दखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा गाठणारे खासदार संजय काकडे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत केलेल्या व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला प्रतिकूल असलेल्या भविष्यवाणीची भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, काकडे यांना राज्यातील भाजप नेतृत्व व पक्षाच्या प्रभारींमार्फत योग्य ती "समज' देण्यात आल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. 

नवी दिल्ली : भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा गाठणारे खासदार संजय काकडे यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत केलेल्या व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला प्रतिकूल असलेल्या भविष्यवाणीची भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, काकडे यांना राज्यातील भाजप नेतृत्व व पक्षाच्या प्रभारींमार्फत योग्य ती "समज' देण्यात आल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. 

गुजरातेत भाजप पराभूत होईल, असे आपले सर्वेक्षण सांगते, असे काकडे यांनी म्हटले होते. हार्दिक पटेल यांच्याबद्दलच्या वादग्रस्त सीडी याही भाजपला फटका बसवतील, असेही त्यांनी म्हटले होते. कोणत्या सर्वेक्षणांच्या आधारावर तुम्ही भाजपच्या पराभवाचे जाहीर मतप्रदर्शन केले होते, असे त्यांना विचारण्यात आल्याचे समजते. 

पुण्याचे काकडे हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत; मात्र ते भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून सत्तारूढ बाजूच्या बाकांवरच बसत आहेत. गुजरात निवडणुकीत त्यांनी भाजपला फटका बसेल, असे भाकीत वर्तवले होते. खुद्द भाजप खासदारनेच असा "घरचा आहेर' देणे कितपत योग्य आहे. पक्षाच्या शिस्तीत हे कोठे बसते? या प्रश्‍नांवर निवडणूक धामधुमीत भाजप नेत्यांनी, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असे म्हणून वेळ मारून नेली होती. निवडणूक पार पडून भाजप स्पष्ट बहुमतासह पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आता काकडे यांचा हिशेब दिल्लीतून चुकता करण्याची वेळ आल्याच्या हालचाली आहेत.

पक्षनेतृत्वाने निवडणुकीचा अखेरचा टप्पा पार पडताच याबाबत संबंधित पक्षनेत्यांना काकडे यांच्याशी तातडीने बोलून त्यांना समज देण्याचे निर्देश देण्यात आले. निकालानंतर काकडे यांनी, "मोदी हिरो, काकडे झिरो' असे वक्तव्य केले होते; मात्र सूत्रांनी सांगितले, की भाजप नेतृत्व त्यांच्यावर चांगलेच संतापले असून, निकालानंतर काकडे यांच्या प्रतिक्रियेची भाजपच्या दृष्टीने काहीही किंमत नाही. काकडे थेट भाजप खासदार नसल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊ शकत नाही; मात्र भाजपच्या संबंधित नेत्यांनी त्यांची दूरध्वनीद्वारे झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national politics MP sanjay kakde