कर्नाटकातील आगामी निवडणुका म्हणजे 'राम विरूद्ध अल्ला' : भाजप आमदार

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जानेवारी 2018

''आगामी निवडणूक म्हणजे राम विरुद्ध अल्लाह अशी होणार असल्याने आता तुम्ही सर्व हिंदूंना ठरवायचे, येथे राम जिंकणार की अल्लाह''.

 सुनील कुमार, भाजप आमदार

बंगळूरू : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीपूर्वीच भाजप आमदाराने कर्नाटकातील आगामी निवडणुका म्हणजे राम विरूद्ध अल्लाहची लढाई आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

कल्लाडका जिल्ह्यात भाजपच्या एका रॅलीला संबोधित करताना कुमार यांनी हे वक्तव्य केले. आमदार सुनील कुमार हे करकाला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंतवाल मतदारसंघात ते बोलत होते. ते म्हणाले, "ही निवडणूक म्हणजे हिंदूंच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे''. आगामी विधानसभा निवडणुकीत बंतवाल मतदारसंघात भाजपचे राजेश नायक आणि काँग्रेसचे रामनाथ राय या उमेदवरांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, ''आगामी निवडणूक म्हणजे राम विरुद्ध अल्लाह अशी होणार असल्याने आता तुम्ही आता सर्व हिंदूंना ठरवायचे, येथे राम जिंकणार की अल्लाह''. 

दरम्यान, कुमार यांच्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात कलम 153 (अ) आणि 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
 

Web Title: Marathi News National Politics For Ram Vs Allah Comment Case Against Karnataka BJP MLA