तमिळनाडूत 'दिनकरन' उदय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

चेन्नई : तमिळनाडूत "अण्णा द्रमुक'च्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या राधाकृष्णनगर (आर. के. नगर) मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शशिकला गटाचे नेते आणि अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन हे विजयी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिनकरन यांच्या विजयामुळे राज्यातील समीकरणेच बदलण्याची शक्‍यता आहे. मदुराई विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिनकरन यांनी आपणच जयललिता यांचे खरे वारसदार आहोत, असे सांगत पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यातील सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. 

ते म्हणाले, ""पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाकडे आहे यामुळे फारसा फरक पडत नाही. कारण आजच्या निकालामुळे आम्ही खरे "अण्णा द्रमुक' आहोत हे सिद्ध झाले आहे. जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचा कौल नेमका कोणाला आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. हा दीड कोटी मतदारांचा विजय असून, पुढील तीन महिन्यांमध्ये "अण्णा द्रमुक' सत्तेतून बेदखल झालेला असेल.'' दरम्यान या निकालानंतर दिनकरन गटाची ताकद वाढणार असल्याने सत्ताधारी "अण्णा द्रमुक' सावध झाला आहे. जयललिता यांच्या निधनानंतर "अण्णा द्रमुक' तीन गटांमध्ये विभागल्या गेला होता. पलानीस्वामी, पनीरसेल्वम आणि दिनकरन अशी तीन पाती यातून निर्माण झाली होती. दिनकरन यांच्या गटाने "अण्णा द्रमुक'च्या अधिकृत पक्ष चिन्हावरदेखील दावा सांगितला होता; पण त्यांचा हा दावा निवडणूक आयोगासमोर टिकाव धरू शकला नाही. 

आर. के. नगर मतदारसंघामध्ये लोकशाहीचा पराभव झाला असून, धनशक्तीचा विजय झाला आहे. 
दुराई मुरुगन, "द्रमुक'चे नेते 

पोटनिवडणुकीच्या निकालामुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. "अण्णा द्रमुक' हा मोठा वृक्ष असून, कोणीही त्याला मारू शकत नाही. काही फांद्या तुटल्या असल्या तरीसुद्धा वृक्ष शाबूत आहे. 
सेल्लूर. के. राजू, "अण्णा द्रमुक'चे नेते 

प. बंगालमध्ये "तृणमूल'चा वरचष्मा 
पश्‍चिम बंगालमधील सबांग विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार गीताराणी भूनिया 64 हजार 192 मतांच्या फरकाने विजयी झाल्या असून, त्यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या रिता मोंडल यांना पराभूत केले. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवार अंतरा भट्टाचार्य या तृतीयस्थानी राहिल्या.

या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुढील महिन्यात पश्‍चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर तृणमूलच्या उमेदवाराचा हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 
 
Web Title: marathi news national politics TTV dinakaran