बाल लैंगिक शोषण आणि विक्रीविरुद्ध सत्यार्थी यांची भारत यात्रा 

कैलाश सत्यार्थी
कैलाश सत्यार्थी

नवी दिल्ली : बालकांची विक्री आणि लैंगिक शोषण याविरुद्धच्या लढा आणखी तीव्र करण्यासाठी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी ऐतिहासिक भारत यात्रा काढणार आहेत. ‘सुरक्षित बचपन- सुरक्षित भारत’ या संकल्पनेची अभिव्यक्ती या यात्रेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येणार आहे. ३५ दिवसांमध्ये २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ही यात्रा काढण्यात येणार आहे.

कन्याकुमारीपासून या यात्रेची सुरुवात होणार असून, नंतर ती पूर्ण पश्चिम भारताचा प्रवास करेल. पूर्वेकडील यात्रा गुवाहाटीपासून सुरू होईल, तर उत्तर भागातील यात्रेला श्रीनगरमधून सुरवात होईल. १५ ऑक्टोबर रोजी ही यात्रा नवी दिल्ली येथे एकत्र होईल.

मुलांचे स्वातंत्र्य, संरक्षण आणि सुरक्षा याबद्दल कैलाश सत्यार्थी गेली ३६ वर्षे जगभरात मोहीम राबवत आहेत. त्यांनी १९९८ साली ऐतिहासिक जागतिक मोर्चा काढला होता. त्याचा परिणाम होऊन आयएलओने वाईट बालकामगार पद्धतीविषयी आंतरराष्ट्रीय ठराव परीत केला होता. त्याचप्रमाणे २००१ साली त्यांनी शिक्षण यात्रा काढली होती. या यात्रेनंतर शिक्षण हक्काचा भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांमध्ये समावेश करण्यात आला होता. एक वैचारिक नेतृत्व म्हणून त्यांनी आपल्या देशातील सामाजिक आणि राजकीय धोरणांच्या आखणीमध्ये उत्प्रेरकाची भूमिका निभावली आहे. बालहक्कांच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २०१४ साली त्यांनी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. १८९३ साली विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या भाषणाच्या दिनाचे औचित्य साधत ११ सप्टेंबर रोजी विवेकानंदांच्या स्मारकापासून या यात्रेची सुरुवात होईल.

अशा अत्याचारांच्या घटनांमधून बचावलेल्या मुलांच्या कुटुंबियांसोबत करण्यात येणाऱ्या भारत यात्रेची घोषणा करताना सत्यार्थी म्हणाले, “लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि विक्री याविरुद्ध आज मी युद्ध पुकारत आहे. भारत देश मुलांसाठी पुन्हा एकदा सुरक्षित करण्यासाठी मी आज ऐतिहासिक भारत यात्रेची घोषणा करत आहे. आपल्या मुलांची निरागसता, हास्य आणि स्वातंत्र्यावर कायम घाला घातला जातो आणि बलात्कार केला जातो हे मी कदापी सहन करणार नाही. हे साधे गुन्हे नाहीत. आपल्या देशाला लागलेला हा संसर्गजन्य रोग आहे.”

गेल्या चार दशकांमध्ये सत्यार्थी काही मोठ्या नागरी चळवळींचे उद्गाते राहिले आहेत. लहान मुलांच्या बाबतीत होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसेचे निर्मूलन करणे हे सत्यार्थी यांच्या जीवनाचे आयुष्यभरासाठी मिशन आहे. सप्टेंबर महिन्यात ही यात्रा सुरू करण्यासाठी सत्यार्थी आणि केएससीएफ ही त्यांची संस्था गेले अनेक महिने तयारी करत आहेत. या तयारीचा भाग म्हणून सत्यार्थी यांनी संपूर्ण देशभर प्रवास केला आहे. या प्रवासात त्यांनी नागरीक, धर्मगुरू, कर्मचारी, कॉर्पोरेट, संसदीय प्रतिनिधी, सामाजिक संस्था इत्यादींची भेट घेतली. हा लढा सुरू करणे आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे अत्यंत मोठे काम आहे, या भावनेने या सर्वांनी भारत यात्रेला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

लहान मुलांची विक्री आणि लैंगिक शोषण याविषयी जाणीव करून देण्यासाठी अलीकडेच त्यांनी दिल्लीत संसदीय प्रतिनिधींची भेट घेतली आणि या संदर्भात जागृती करण्यासाठी पाठींबा देण्याचे आवाहन केले. गेल्या महिन्यात त्यांनी बंगळुरू येथे 'लिंक्ड इन'च्या ५०० कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आपल्या देशाच्या भविष्यासाठी 'लिंक्ड इन'सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांनी खंबीर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याची जाणीव करून दिली. यापुढील काही महिने ते अशाच प्रकारे भेटी घेणार आहेत. ते नवी दिल्ली आणि देशभरातील विविध धर्मगुरूंची भेट घेत आहेत, जेणेकरून हा लढा भारतभर सर्व ठिकाणी पोहोचेल याची खातजमा होईल. या महामोर्चाच्या मोहिमेचा ‘कर्टन रेझर’ दिल्लीमध्ये सादर करण्यात आला. ही मोहीम भारतभरातील १ कोटी संबंधित घटकांपर्यंत पोचेल, अशी अपेक्षा आहे. 

काहीजणांच्या दुष्कृत्यामुळे भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक यातना अशा प्रकारे विक्री झालेल्या मुलांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात कथन केल्या. या कुटुंबियांनी त्यांचा पाठींबा देण्याची प्रतिज्ञा केली आणि मुलांच्या शोषणाविरुद्धचा लढा चालू राहण्याबाबत देशाला आवश्यकता असलेली क्रांती घडेल, अशी आशा त्यांना वाटत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com