राज बब्बर यांचा उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

''मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नवी व्यवस्था केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षांकडून ज्या नव्या जबाबदाऱ्या देण्यात येतील, त्या स्वीकारून 2019 च्या निवडणुकांच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील''.

- राज बब्बर, काँग्रेसचे नेते 

नवी दिल्ली : 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून पक्ष संघटनेत बदल करण्याबाबत सूचना येत आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसच्या रणनीतीमध्येही बदल केला जात आहे. त्यानुसारच उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, बब्बर यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Raj babbar

काँग्रेसच्या संघटनेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत काही दिवसांपासून मिळत आहेत. त्यानुसार पक्षामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज बब्बर यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. राज बब्बर यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्याजागी एखाद्या ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पक्ष संघटनेत मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत दिले होते. या नव्या रचनेत तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मात्र, उत्तरप्रदेशची कमान कोणाच्या खांद्यावर द्यायची, याचा निर्णय हायकमांडच घेणार आहे. तोपर्यंत राज बब्बर हेच प्रदेशाध्यक्ष पदावर असतील, असे सांगण्यात येत आहे. 

''मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नवी व्यवस्था केली जात आहे. काँग्रेस अध्यक्षांकडून ज्या नव्या जबाबदाऱ्या देण्यात येतील, त्या स्वीकारून 2019 च्या निवडणुकांच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील'', असे राज बब्बर म्हणाले. 

Web Title: Marathi News Political News Raj Babbar quits as Congress UP chief