भाजपचे आता 'लक्ष्य 350'; शहा यांची निवडक मंत्री, पदाधिकाऱ्यांशी चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नियमित सर्वेक्षण 
भाजपच्या राजकीय परिस्थितीबाबत अमित शहा हे दर सहा महिन्यांनी नियमितपणे एक सर्वेक्षणही करून घेत असल्याची माहिती आहे. संघपरिवारातील एका संस्थेकडून हा उपक्रम राबविला जातो व संबंधित लोक थेट शहांशी याबाबत बोलतात.

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच 2019 मधील पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिला गिअर टाकला आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज 11, अशोक रस्ता या भाजप मुख्यालयात केंद्रातील निवडक मंत्री व पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 2014 मध्ये जेथे भाजपला पराभव स्वीकारावा लागला ती राज्ये व त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे सक्त निर्देश दिले.

पक्षाने आगामी निवडणुकीत 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या 272 पैकी बहुतांश जागांवर भाजपचे नवे चेहरे दिसण्याची शक्‍यता आहे. सुमारे दोन तास चाललेल्या या खलबतांनंतर सारे मंत्री गुपचूप निघून गेले. 

पंतप्रधान मोदी यांनी 2014 च्या जूनमध्ये राज्यसभेत प्रथमच बोलताना, 'चार वर्षे देशकारण व उरलेले एक वर्ष राजकारण', असे सूत्र मांडले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत झपाट्याने बदललेली परिस्थिती पाहून भाजप नेतृत्व वेळेआधीच सावध झाले आहे. पक्षाने साडेतीनशे जागांचे उद्दिष्ट ठेवल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ज्या जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्या त्या (अमेठी- रायबरेलीसह) सर्व जागा जिंकण्याची रणनीती काय असेल याबाबतचे एक सादरीकरण या वेळी केले गेले. पश्‍चिम बंगाल, केरळ, ओडिशा, तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकात सुधारणेला भरपूर वाव असल्याचे शहा म्हणाले. याशिवाय मध्य प्रदेश व महाराष्ट्रासारख्या राज्यांकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी सूचकपणे नमूद केले. 

ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. रामलाल वगळता इतर मंत्र्यांना 'बैठकीला या' एवढाच निरोप पंधरवड्यापूर्वी गेला होता. त्यांनाही बैठकीचा अजेंडा काय, हे शहांच्या दालनात जाईपर्यंत माहिती नसल्याचे समजते. संघटनमंत्री रामलाल, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, अनंतकुमार, जे. पी. नड्डा, नरेंद्रसिंह तोमर, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन, अर्जुनराम मेघवाल, मनोज सिन्हा हे मंत्री व राम माधव, अनिल जैन, मुरलीधर राव, अरुण सिंह, कैलास विजयवर्गीय हे पदाधिकारीही बैठकीत होते. 

या वेळी या संस्थेचे प्रमुख, शहा व 'पीएमओ'तील एक अधिकारी एवढे चार-पाच लोक बैठकीत असतात. मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनांनंतर शहा यांनी त्या बैठकीतूनच संबंधित मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली होती असे समजते. शहा यांच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये विरोधक इतके विखुरलेले असताना एकदा मोदींचा झंझावात सुरू झाला, की भाजपला साडेतीनशे जागांचे उद्दिष्ट गाठणे कठीण नाही. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news politics BJP Narendra Modi Amit Shah Loksabha 2019