भाजपला शह देण्यासाठी ममतादीदी वळल्या 'सौम्य हिंदुत्वा'कडे 

file photo of Mamata Banerjee
file photo of Mamata Banerjee

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे आव्हान मोडीत काढण्यासाठी 'तृणमूल काँग्रेस'च्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 'सौम्य हिंदुत्वा'ची पायवाट निवडली आहे. तत्पूर्वी भाजपने राज्य सरकारवर अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावरून निशाणा साधला होता. सरकारकडून मुस्लिम इमाम आणि धर्मगुरूंना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांनाही भाजपने आक्षेप घेतला होता. भाजपचे डावपेच लक्षात येताच ममतांनी देवस्थानांना भेटी द्यायला सुरवात केली आहे. 

मध्यंतरी काँग्रेसचे आमदार मिलान रशीद यांनी हिंदू धर्मगुरूंना भत्ते का दिले जात नाहीत, असा सवाल केला होता. त्यांच्या या वक्तव्याला भाजपने वेगळेच वळण देत हा मुद्दा अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासोबत जोडत आपणच बहुसंख्याकांचे तारणहार आहोत, अशी मांडणी करायला सुरवात केली होती. ही बाब ममतांच्या लक्षात येताच त्यांनी 'सौम्य हिंदुत्वा'चा स्वीकार केला होता. काही दिवसांपूर्वी पुरीतील जगन्नाथ मंदिराला भेट देणाऱ्या ममतांनी बुधवारी सागर आयलंड येथील मंदिराला भेट देत गंगासागर मेळ्याच्या तयारीची पाहणी केली होती. या वेळी कपिल मुनी मंदिराला भेट दिल्यानंतर ममतांनी मुख्य संत महंत ग्यानदास यांच्याशी चर्चाही केली होती. 

विवेकानंदांचा आधार 
ममतांच्या भाषणांमध्येही आता भगवी किनार स्पष्टपणे दिसू लागली असून, त्यांच्या भाषणांतून स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस डोकावताना दिसतात. बहुसंख्य हिंदू मतदार आपल्यापासून दूर जाऊ नये, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे वीरभूम जिल्ह्यातील नेते अनुव्रत मोंडल यांनी तर चक्क हिंदू नेत्यांच्या मेळ्याचे आयोजन केले आहे. हिंदू धर्मगुरूंची संघटना उभारून त्यांना सर्व सरकारी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

विश्‍लेषकांची संमिश्र प्रतिक्रिया 
'तृणमूल काँग्रेस'च्या या भगव्या ट्रेंडवर राज्यातील विश्‍लेषकांनी चिंता व्यक्त केली असून, आतापर्यंत जाती-धर्माच्या राजकारणापासून दूर असलेला बहुसंख्य समाज यामुळे विभागला जाऊ शकतो, अशी भीती त्यांना सतावते आहे. काहींनी ममतांच्या या भूमिकेचे स्वागतही केले आहे, कारण मुळातच पक्षाचे धोरण हे सर्वांना आनंदी ठेवण्याचे आहे, असे कोलकत्यातील 'स्टडीज इन सोशल सायन्सेस'मधील संशोधक मैदूल इस्लाम यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com