"बीए', "बीएससी' बंद या अफवा : जावडेकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 जून 2017

नवी दिल्ली - ""विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) "बीए' व "बीएस्सी' अभ्यासक्रम रद्द करणार असल्याची चर्चा ही शुद्ध अफवा आहे,'' असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळला सांगितले. अभ्यासक्रम बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्या मंत्रालयासमोर नाही असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली - ""विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) "बीए' व "बीएस्सी' अभ्यासक्रम रद्द करणार असल्याची चर्चा ही शुद्ध अफवा आहे,'' असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळला सांगितले. अभ्यासक्रम बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्या मंत्रालयासमोर नाही असेही ते म्हणाले.

"अभ्यासक्रम बंद करण्यात येणार असल्याच्या काहीही तथ्य नसल्याचे जावडेकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात यूजीसी व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजे एआयसीटीई यांचे नियमन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करणे समजू शकतो पण म्हणून मात्र कोणतेही वर्तमान अभ्यासक्रम अचानक बंद करणे हा याचा अर्थ असू शकत नाही व तसा काही प्रस्तावही नाही,'' असे जावडेकर यांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

यूजीसी लवकरच बीए व बीएस्सी अभ्यासक्रम रद्द करणार असल्याची अफवा सोशल मीडियावर फिरत आहे. त्याऐवजी व्होकेशनल प्रशिक्षण देणारा "बी व्होक' नावाचा नवा अभ्यासक्रम लागू होणार असल्याचेही यात म्हटले आहे. एच. देवराज या नावाने ही पोस्ट फिरत आहे. मात्र यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे ते माजी उपाध्यक्ष असल्याचे दिसते. दरम्यान, यूजीसी व एआयसीटीई यांचे एकत्रिकरण करून देशभरात एकच उच्चशिक्षण नियमन संस्था निर्माण करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव आहे. त्यावर सध्या मंत्रालय पातळीवर विचार सुरू आहे. केंद्राच्या विविध समित्यांनीही यापूर्वी म्हणजे नियोजन मंडळ अस्तित्वात असल्यापासून असे प्रस्ताव दिले होते याकडे मंत्रालय सूत्रांनी लक्ष वेधले.

खासगी "लॉबी'चा हात?
मनुष्यबळ विकास मंत्रालयातील सूत्रांनुसार निकालांच्या दिवसांतच सोशल मीडियावर अभ्यासक्रम बंद होणार असल्याचे वृत्त पसरविण्यामागे "लॉबी' असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. खासगी उच्चशिक्षणसंस्थांतील रिक्त जागांची संख्या हजारोंच्या संख्येने वाढत चालल्याचेही सूत्रांनी सूचकपणे नमूद केले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2013 मध्ये असे वृत्त देवराज यांच्या नावाने आलेले होते. असा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 10 वर्षांचा कार्यकाल ठेवला असल्याचेही त्यात म्हटले होते. वर्तमान सरकारसमोर असा प्रस्ताव सध्या नाही. कौशल्य विकास मंत्रालयासमोरही "बी व्होक' नावाच्या अभ्यासक्रमाचा प्रस्ताव नाही. राजीव प्रताप रूडी यांनी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध कार्यक्रमांची घोषणा केली आहे. त्यात "बी व्होक' नावाच्या अभ्यासक्रमाचा त्यांनी अद्याप उच्चारही केलेला नाही.

Web Title: marathi news prakash javdekar ba bsc india news