बुलेट ट्रेनच्या शुभारंभापूर्वी रेल्वेची नामुष्की; राजधानी एक्सप्रेस घसरली

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

यापूर्वी, अलीकडेच उत्कल आणि कैफीयत एक्सप्रेस दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला होता.

नवी दिल्ली : दिल्ली रेल्वे स्थानकावर आज (गुरुवार) सकाळी जम्मू राजधानी एक्सप्रेसचा शेवटचा डबा घसरला. यावेळी मोठी दुर्घटना टळली. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ही रेल्वे नवी दिल्ली रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करत होती तेव्हा ही घटना घडली. 

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम अहमदाबादमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या काही तास अगोदरच राजधानी एक्सप्रेस घसरल्याने रेल्वे खात्यावर नामुष्की ओढवली आहे. 

यापूर्वी, अलीकडेच उत्कल आणि कैफीयत एक्सप्रेस दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधानांनी तो नाकारला, मात्र नंतर तो स्वीकारत रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे सोपवली होता. मात्र त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही. अशा परिस्थितीतच बुलेट ट्रेनच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आला आहे. बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या आधी सध्याची रेल्वेसेवा मजबूत आणि सुरक्षित करा अशी संतप्त भावना प्रवासी व्यक्त करतायत.

मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुजरातमधून केला जात आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमीपूजन केले.  जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत १.८ लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय अन्य दहा सामंजस्य करारांवरही मोदी-आबे भेटीत स्वाक्षऱ्या होतील.

  • उत्तर प्रदेशात १९ ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार व ४०० लोक जखमी 
  • उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७० हून अधिक प्रवासी जखमी
  • २९ ऑगस्टला नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनासह ८ डबे आसनगाव-वासिंद या रेल्वे स्थानकांदरम्यान घसरले. त्यानंतर आसनगावजवळ दुरांतो एक्सप्रेस घसरल्याने तब्बल ४ दिवस लोकल ट्नेनची कसारा मुंबई वाहतूक पूर्णपणे बंद होती.
  • ७ सप्टेंबरला उत्तर प्रदेशच्या सोमभद्रमध्ये शक्तीपुंज एक्स्प्रेसचे ७ डबे रुळांवरुन घसरले
  • त्याच दिवशी रांची राजधानी एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले
  • ७ सप्टेंबरलाच खंडाळ्याजवळ मालगाडी घसरल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
     
Web Title: marathi news rajdhani express derail in new delhi