जेटलींना 'बदमाश' म्हणायला केजरीवालांनीच सांगितले: जेठमलानी

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्यात केजरीवाल यांची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी पुढाकार घेतला होता. आता जेठमलानींनीच केजरीवाल यांना अडचणीत आणायला सुरूवात केली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांच्यातील कलगीतुरा आता चांगलाच रंगू लागला आहे. केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना उद्देशून 'बदमाश' (क्रुक) असा शब्द वापरल्याचा आरोप जेठमलानी यांनी केला आहे. शिवाय, त्याहीपुढे जाऊन 'अत्यंत घाणेरडे शब्द' केजरीवाल यांनी जेटली यांच्याबद्दल वापरले असल्याचा नवा आरोप जेठमलानी यांनी केला.

विशेष म्हणजे जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्यात केजरीवाल यांची बाजू मांडण्यासाठी जेठमलानी यांनी पुढाकार घेतला होता. आता जेठमलानींनीच केजरीवाल यांना अडचणीत आणायला सुरूवात केली आहे. 

'जेटली यांनी पहिल्यांदा तुमच्याविरुद्ध गुन्हेगारी खटला दाखल केला, तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या माझ्याकडे मदतीसाठी आला होतात. त्यावेळी 'बदमाश' या शब्दाहून अनेक घाणेरड्या शब्दांचा वापर आपण कित्येकदा केला होतात. आपल्या विवेकाला स्मरून तुम्ही हे शब्द आठवा. या बदमाशाला धडा शिकवा, असे किमान शंभरवेळा आपण माझ्यासमोर म्हणाला होतात,' असा दावा जेठमलानी यांनी केला आहे. केजरीवाल यांना जेठमलानी यांनी खुले पत्रच लिहिले असून ते स्वतःच्या ब्लॉगवर अपलोड केले आहे. 

जेटली यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यासंदर्भात आपण कधीही जेठमलानी यांनी सांगितले नव्हते, असे प्रतिपादन केजरीवाल यांनी नुकतेच दिल्ली न्यायालयात केले. त्यावरून जेठमलानी खवळले आहेत. केजरीवाल यांनी न्यायालयात सादर केलेल्या पत्रात म्हटले होते, की खटल्याच्या कुठल्याही टप्प्यावर वादींविरुद्ध (जेटली) अपशब्द वापरण्याची सूचना आपण आपल्या वकीलास केलेली नाही. 

खटल्याला उशीर करण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असल्याचा आरोप जेटली यांनी न्यायालयात केला आहे. आपल्याला जाणिवपूर्वक बदनामीकारक प्रश्न विचारले जात असून आपल्याबद्दल बदमाश शब्दाचा वापर केला जात आहे, असे जेटलींचे म्हणणे आहे. 

जेठमलानी यांनी यासंदर्भात केजरीवाल यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे, की मला पाठवलेले पत्र पाहून जेटली आपला दावा मागे घेतील, असे वाटत असेल, तर काहीही करून दाव्यात तडजोड करा. त्याच्या परिणामांना मी जबाबदार असेन.

यापुढे केजरीवाल यांचा कुठलाही खटला लढविणार नसल्याचे जेठमलानी यांनी जाहीर केले आहे. शिवाय, सध्याच्या खटल्याची फी एकरकमी चुकती करण्याची मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. जेटली यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात केजरीवाल यांची बाजू न लढविण्याचा निर्णय जेठमलानी यांनी गेल्याचा आठवड्यात जाहीर केला आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Marathi News Ram Jethmalani Arvind Kejriwal War Of Words