रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर हाकलणारच! - गृहराज्यमंत्री रिजिजू

वृत्तसंस्था
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

भारतात 40 हजार रोहिंग्या मुस्लिमांचे वास्तव्य!
संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतात 14 हजार रोहिंग्या निर्वासित असल्याची नोंद आहे. मात्र, हा आकडा 40 हजारांपेक्षा जास्त असल्याची चर्चा आहे. हे सर्व बांगलादेशमार्गे भारतात घुसले आहेत. ज्यांच्याकडे पारपत्र आहेत त्यांनाच निर्वासितांचा दर्जा मिळू शकतो. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी योग्य कारवाई करावी, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

नवी दिल्ली : म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लिम हे अवैधरीत्या भारतात राहत असल्याने त्यांना देशाबाहेर हाकलण्यात येईल. जगात सर्वांत जास्त निर्वासीतांना भारतानेच आश्रय दिला असून रोहिंग्याबाबत सरकारला कुणी प्रवचन देण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी आज सुनावले.

"मला आंतरराष्ट्रीय संघटनांना स्पष्टपणे सांगायचे की, रोहिंग्या मुस्लिमांची संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्‍क आयोगात नोंदणी असो किंवा नसो, ते रोहिंग्या निर्वासित भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्याला आहेत. परिणामी त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. निर्वासीतांना आश्रय देण्याच्या मुद्यावर बोलायचे झाल्यास आज भारतात सर्वांत जास्त विदेशी निर्वासित वास्तव्याला आहेत. त्यामुळे हे प्रकरण कसे हाताळावे हे शिकविण्याची गरज नाही,'' असे रिजिजू यांनी सुनावले. रोहिंग्या निर्वासितांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, या मुद्द्यावर आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत. त्यामुळे आम्ही अमानवी कसे? भारतात आश्रयास आलेल्या दोन रोहिग्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निर्वासितांना देशातून बाहेर काढू नये, अशी मागणी केली आहे. म्यानमारधील राखीन प्रांतात बौद्ध आणि रोहिंग्या यांच्यात वांशिक संघर्ष सुरू असून बौद्धांच्या हल्ल्यात आतापर्यंत हजारो रोहिंग्या मारले गेले आहेत. परिणामी हे रोहिंग्या शेजारच्या बांगलादेश, भारत या देशांमध्ये आश्रयाला येत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी

Web Title: marathi news rohingya muslims kiren rijiju controversy